Site icon

नाशिक : सफाई कामगारांच्या वारसांना मिळणार नोकरीत प्राधान्य

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सफाई कामगारांना लाड पागे समितीच्या शिफारशींच्या अनुषंगाने वारसा हक्काने नियुक्ती देण्याबाबत शासनाने सुधारित तरतुदी लागू करण्यास मान्यता दिली असून, महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागास शासन आदेश प्राप्त झाला आहे.

सफाई कामगारांच्या वारसा हक्क प्रकरणात नियुक्ती देताना विविध प्रशासकीय विभाग तसेच आस्थापनांना येणाऱ्या अडचणी आणि सफाई कामगारांच्या समस्यांबाबत विविध संघटनांच्या मागण्या विचारात घेत लाड समितीच्या शिफारशींच्या अनुषंगाने सफाई कामगारांच्या वारसा हक्काबाबत यापूर्वी निर्गमित करण्यात आलेले सर्व शासन निर्णय तसेच परिपत्रके अधिक्रमित करण्यात येऊन एकत्रित नवीन शासन निर्णय लागू करण्यात आला आहे. या निर्णयामुळे वारसा हक्काने द्यावयाच्या नियुक्त्यांचा मार्ग अधिक मोकळा झाला आहे.

नाशिक महापालिकेत एकूण १९९३ इतके सफाई कर्मचारी आहेत. त्यापैकी आजमितीस १७५० इतके कर्मचारी कार्यरत असून, जवळपास २४३ कर्मचाऱ्यांच्या जागा अनेक कारणांमुळे रिक्त आहेत. या कर्मचाऱ्यांच्या जागी त्यांच्या वारसांना नियुक्ती देण्यासाठी लाड पागे समितीची महापालिकेत स्थापना करण्यात आलेली आहे. समितीच्या अध्यक्षपदी अतिरिक्त आयुक्त असून, सदस्य म्हणून सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त, लेखा व वित्त अधिकारी, मुख्य लेखापरीक्षक, कामगार कल्याण विभागाचे उपायुक्त आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक हे सदस्य आहेत. सेवानिवृत्त कर्मचारी, स्वेच्छानिवृत्ती, वैद्यकीयदृष्ट्या अपात्र तसेच मयत सफाई कर्मचाऱ्यांच्या जागी त्यांच्या वारसांना वारसा हक्काने नियुक्ती देण्याबाबत समिती कामकाज पाहते आणि समितीमार्फत कागदपत्रांची छानणी केली जाते.

यांना मिळणार नोकरीत प्राधान्य

शासन आदेशानुसार अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्ग, सफाई कामगारांच्या व्याख्येत बसणारे सर्व सफाई कामगार, पूर्वी ज्या सफाई कामगारांनी डोक्यावरून मैला वाहून नेण्याचे काम केले अशा सर्व सफाई कामगारांच्या वारसांना वारसा हक्काने नोकरीत प्राधान्य देण्याचे निर्देश शासनाने दिले आहे. मात्र सर्वसाधारणपणे रोजंदारी, कंत्राटी तत्त्वावरील तसेच बाह्यस्त्रोताद्वारे काम करणाऱ्या व्यक्ती या योजनेअंतर्गत लाभ घेण्यास पात्र नसतील, असे शासन आदेश म्हटले आहे.

वारसा हक्कास पात्र ठरणारे वारस

सफाई कामगारांच्या वारसा हक्क प्रकरणात पुढीलपैकी कोणतीही एक व्यक्ती वारस म्हणून पात्र ठरेल. त्यात पत्नी किंवा पती, मुलगा किंवा मुलगी, सून किंवा जावई तसेच विधवा मुलगी, बहीण, घटस्फोटित मुलगी, बहीण, परित्यक्त्या मुलगी, बहीण, अविवाहित सज्ञान मुगली, अविवाहित सज्ञान बहीण, सफाई कर्मचारी अविवाहित असल्यास त्याचा सख्खा भाऊ, सख्खी बहीण, नात किंवा नातू. यापैकी कोणीही वारस उपलब्ध नसल्यास अथवा वारसापैकी कोणीही सफाईचे काम करण्यास तयार नसल्यास सफाई कामगाराचा तह्यात सांभाळ करण्याची लेखी शपथपत्राद्वारे हमी देणरी संबंधित नामनिर्देशित व्यक्ती पात्र ठरू शकते.

हेही वाचा : 

The post नाशिक : सफाई कामगारांच्या वारसांना मिळणार नोकरीत प्राधान्य appeared first on पुढारी.

Exit mobile version