Site icon

नाशिक : सभापती-उपसभापती निवडीतून भविष्याचा वेध

नाशिक : रघुजीबाबांच्या नगरीतून 

येवला : अविनाश पाटील

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि येवल्याचे आमदार छगन भुजबळ या बाहुबली नेत्याच्या मतदारसंघातील आणि नाशिक जिल्ह्यात सर्वात महत्त्वाच्या येवला कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक यावेळी भुजबळांच्या सक्रिय सहभागामुळे चर्चेत आली होती. पंचवार्षिक निवडणुकीमध्ये भुजबळ यांच्यासह शिवसेनेचे युवा नेते संभाजी पवार, सहकार नेते अंबादास बनकर यांनी एकत्र येऊन शेतकरी विकास पॅनलची निर्मिती केली होती. अपेक्षेप्रमाणे हे पॅनल बहुमताने सत्तेत आले, तर ज्येष्ठ नेते अ‍ॅड. माणिकराव शिंदे, आ. दराडे बंधू यांच्यासह भाजपचे नेते बाबा डमाळे यांनी शेतकरी समर्थक पॅनलची निर्मिती करून या निवडणुकीत चुरस निर्माण केली होती. या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आव्हान प्रति आव्हान तालुकाभर गाजले होते. या प्रचारामुळेच भुजबळांपुढे पुढील विधानसभा निवडणुकीतील उमेदवार कोण राहणार, याची कल्पना येवल्यातील जनतेला आली आणि भविष्यात तगडे आव्हान आपल्यापुढे आहे, हेही भुजबळांच्या लक्षात आले असेल. त्यामुळे त्यांनी बेरजेच्या राजकारणावर भर देण्यास सुरुवात केली आहे.

बाजार समितीचा सभापती कोण होणार, या चर्चेला मागील आठवडाभर उधाण आले होते. शेतकरी विकास पॅनलचे आणि शिवसेनेचे नेते संभाजी पवार यांच्या ज्येष्ठ बंधूंच्या पत्नी सविता पवार या सर्वाधिक मतांनी निवडून आल्यामुळे सभापती पदावर त्यांचा दावा निश्चित मानला जात होता, तर यानंतर सभापती पदासाठी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय बनकर यांचेही नाव चर्चेत होते. या सगळ्या चर्चांना विराम देत ज्येष्ठ नेत्यांच्या घरातील उमेदवारांपेक्षा सामान्य उमेदवारांना भविष्यातील निवडणुकींची रणनीती म्हणून अंदरसूल येथील किसनराव धनगे यांना सभापतिपद दिले गेले, तर उपसभापतिपदी संभाजी पवार यांचे खंदे समर्थक अ‍ॅड. बापू गायकवाड यांना संधी मिळाली. यामुळे गावगप्पांना चाप बसून येत्या विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक समोर ठेवून कार्यकर्त्यांना खूश करण्याची रणनीती भुजबळ संपर्क कार्यालयाकडून खेळली गेली. या निवडणुकीमध्ये सोसायटी गटामध्ये भुजबळांचे खंदे समर्थक आणि भुजबळांवरील प्रेमापोटी भल्याभल्यांना अंगावर घेणारे मोहन शेलार यांचा एका मताने पराभव झाला होता. विरोधकांपेक्षा स्वकीयांनी घात केल्याची चर्चा शेलार समर्थक करीत होते. निष्ठेने काम करणार्‍या कार्यकर्त्याचा पराभव सर्वांना चटका लावून गेला होता. त्यात सभापती आणि उपसभापती पद जर नेत्यांच्याच घरात दिले गेले असते, तर वेगळा संदेश गेला असता. तो टाळण्यासाठी भुजबळांकडून कार्यकर्त्यांना प्राधान्य दिल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते.

सभापतिपदामुळे संपर्क कार्यालयावरील अंबादास बनकर आणि महेंद्र काले यांची पकड मजबूत असल्याचे यामुळे दिसून आले. भविष्यात अंदरसूल जिल्हा परिषद गटातून सद्यस्थितीतील जिल्हा परिषद सदस्य काले किंवा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष राधाकिसन सोनवणे हेच उमेदवारीसाठी बाजी मारणार हे या निमित्ताने सिद्ध झाले. या जागेसाठी संपर्क कार्यालयात मोठी रस्सीखेच असल्याची चर्चा सातत्याने घडते. भुजबळ कारावासात असताना त्यांचे खंदे समर्थक मकरंद सोनवणे हे शिवसेनेकडून राष्ट्रवादीच्या महेंद्र काले यांच्याविरुद्ध लढले होते, ते पुन्हा राष्ट्रवादीच्या गोटात परतले असून, उंदीरवाडी येथील राष्ट्रवादीचे सचिन कळमकर हेसुद्धा या जागेसाठी इच्छुक आहेत. एकंदरीत बाजार समितीच्या सभापती, उपसभापती निवडीने अंदरसूल गटावरील काले यांची पकड घट्ट असल्याचे दाखवून दिले.

कार्यकर्त्यांना न्याय
गेल्या 15 – 20 वर्षांपासून येवला – लासलगाव मतदारसंघात भुजबळांमुळे अनेकांचे आमदारकीचे स्वप्न बाजूला राहिले आहे. त्यात भुजबळांनी जर तालुक्यातील त्यांच्याबरोबर असलेल्या ज्येष्ठ नेत्यांच्या घरातच पद दिले असते, तर कार्यकर्ते नाराज झाले असते. कारण भुजबळांच्या अडचणीच्या काळात कार्यकर्ते त्यांच्याबरोबर होते. भविष्यात भुजबळांपुढे दराडेंचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. दराडेंना अ‍ॅड. शिंदेंची साथ असून दोन आमदार बंधूंनी तालुक्यात मोठ्या प्रमाणात निधी आणल्याने व कुणाल दराडे यांच्या युवा वर्गातील लोकप्रियतेमुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भर पडली आहे. म्हणूनच भुजबळांनी यावेळेस कार्यकर्त्यांना न्याय दिला अशी चर्चा आहे.

The post नाशिक : सभापती-उपसभापती निवडीतून भविष्याचा वेध appeared first on पुढारी.

Exit mobile version