नाशिक : सरणावरही मिळेना पाणी, अमरधाममध्ये पाणीबाणी

नाशिक : अमरधाम,www,pudhari,news

नाशिक (पंचवटी) : गणेश बोडके

येथील अमरधाममध्ये गेल्या काही दिवसांपासून पाणीपुरवठा बंद झाल्याने येथे अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या मृतांच्या नातेवाइकांना पाण्याच्या आणीबाणीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी येताना मृतांच्या नातेवाइकांना घरूनच पाणी आणण्याची वेळ आली आहे. पाणी नसल्याचे कळल्यानंतर इतरत्र जाऊन पाण्याचा शोध घ्यावा लागत आहे. पाणीपुरवठा विभागाच्या या अनागोंदी कारभारामुळे मृतांच्या नातेवाइकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

हिंदू धर्मात व्यक्ती मृत पावल्यानंतर अमरधाममध्ये अग्निडाग देण्याआधी नातेवाइकांकडून मृताला पाणी देण्याची व अग्निडाग दिल्यानंतर अंघोळ करून, मातीचा घट खांद्यावर घेऊन पाच प्रदक्षिणा घालून श्रद्धांजली अर्पण करण्याची व अंत्यसंस्कार झाल्यानंतर नातेवाइकांनी बाहेर जाताना हात-पाय धुण्याची पद्धत आहे. या सर्व प्रक्रियेमध्ये अनेकदा पाण्याची गरज लागते. मात्र पंचवटी अमरधाममध्ये पाण्याच्या टाक्यांच्या व्यवस्था करण्यात आली असली, तरी सध्या येथील पाणीपुरवठाच बंद असल्यामुळे पाण्याच्या टाक्या कोरड्याठाक पडल्या आहेत.

महापालिकेकडून मोफत अंत्यसंस्काराचा गाजावाजा केला जातो. मात्र, अमरधाममध्ये साध्या सुविधा पुरविल्या जात नसल्याने नातेवाइकांना त्रास होत आहे. गोदावरी नदीकाठावर असलेल्या पंचवटी अमरधाममध्ये पाणीटंचाईची मोठी समस्या निर्माण झाली आहे. अंत्यसंस्कारासाठी गोदापात्रातून पाणी घ्यावे, तर इतके स्वच्छ पाणी पात्रातून वाहात नाही. त्यात सांडपाणी मिसळत असल्याने त्याला गटारगंगेचे स्वरूप आले आहे. त्यामुळे असे सांडपाणी आणणार तरी कसे? असा प्रश्न पडत आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : सरणावरही मिळेना पाणी, अमरधाममध्ये पाणीबाणी appeared first on पुढारी.