Site icon

नाशिक : सव्वापाचशे शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान

नाशिक : वैभव कातकडे 

नाशिक जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांत ७४८ शेतकर्‍यांंचे अपघात झाले असून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेच्या माध्यमातून या शेतकऱ्यांच्या नातेवाइकांना लाभ झाला आहे. या विमा योजनेचे रूपांतर आता गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेमध्ये करण्यात आले आहे. ही योजना थेट राज्य शासनाकडून राबवली जात आहे. या विमा योजनेच्या लाभासाठी आलेल्या अर्जांपैकी ५२६ शेतकऱ्यांच्या नातेवाइकांचे प्रकरणे मंजूर झाले आहेत, तर काही प्रकरणांत त्रुटी असल्याने दुरुस्तीचे काम सुरू झाले असल्याची माहिती कृषी उपसंचालक तात्या शिरसाठ यांनी दिली आहे.

शेती व्यवसाय करताना वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक बसणे इ. नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे होणारे अपघात, यामुळे काही शेतकर्‍याचा मृत्यू ओढवतो, काहीना अपंगत्व येते. घरातील कर्त्या व्यक्तीस तसेच अपघातामुळे कुटुंबाचे उत्पन्न बंद होऊन अडचण निर्माण होते. अशा अपघातग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबास आर्थिक लाभ या योजनेमधून मिळत आहे.

कुटुंबीयांस 2 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य

शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांस 2 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. अपघातात 2 अवयव निकामी होऊन शेतकऱ्याला कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये, तर 1 अवयव निकामी होऊन कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास 1 लाख रुपये आर्थिक मदत दिली जाणार आहे. ज्यांच्या नावावर शेतजमीन आहे, असे सर्वच शेतकरी या योजनेच्या लाभासाठी अर्ज करू शकणार आहेत. पण, ज्यांच्या नावावर शेतजमीन नाही म्हणजे ज्यांचं सातबाऱ्यावर नाव नाही, पण ती व्यक्ती शेतकरी कुटुंबातील आहे, तर अशा कुटुंबातील कोणताही 1 सदस्य या योजनेसाठी अर्ज करू शकणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा 10 ते 75 या वयोगटातील असणे आवश्यक आहे.

हेही वाचा : 

The post नाशिक : सव्वापाचशे शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान appeared first on पुढारी.

Exit mobile version