नाशिक : सव्वा लाख नागरिकांची तहान भागतोय टॅंकर

पिण्याचे पाणी टॅंकर,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राज्यात एकीकडे पाऊस झोडपत असताना, नाशिक जिल्ह्यात अद्यापही अपेक्षित पाऊस झालेले नाही. त्यामुळे ग्रामीण भागाला पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील १ लाख ३१ हजार ५२९ लोकसंख्येला पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. तब्बल ५८ टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा केला जात आहे.

कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाड्याच्या काही भागाला पावसाने तडाखा दिला आहे. उत्तर महाराष्ट्रातही नाशिक वगळता उर्वरित चारही जिल्ह्यांमध्ये पावसाने चांगली बॅटिंग केली आहे. जुलैचे तीन आठवडे संपुष्टात आले असताना, पावसाने दडी मारल्याने जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. हंडाभर पाण्यासाठी भटकंतीची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. त्यामुळेच ग्रामस्थांचे होेणारे हाल बघता, जिल्हा प्रशासनाकडून टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. जिल्ह्यातील सात तालुक्यांमधील ६८ गावे व ३७ वाड्या अशा एकूण १०५ ठिकाणी ५८ टँकरच्या सहाय्याने पाणी पुरविले जात आहे. दिवसभरात हे टँकर १२१ फेऱ्या पूर्ण करत आहेत.

पावसाअभावी येवल्यात सर्वाधिक २२ टँकरच्या सहाय्याने ४९ ठिकाणी पाणीपुरवठा केला जात आहे. मालेगावमध्ये ११ गावे-वाड्यांना १३ टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. तसेच नांदगावला आठ, चांदवड सात, तर बागलाण व देवळ्यात प्रत्येकी तीन, तर सिन्नरला दोन टँकर सुरू आहेत. याशिवाय पाणीपुरवठ्यासाठी जिल्हा प्रशासनाने ३८ विहिरी अधिग्रहित केल्या आहेत. यातील २५ विहिरी गावांसाठी, तर १३ टँकरसाठी अधिग्रहित केल्या आहेत.

हेही वाचा :

The post नाशिक : सव्वा लाख नागरिकांची तहान भागतोय टॅंकर appeared first on पुढारी.