नाशिक : सहायक पोलिस निरीक्षक लाच घेताना जाळ्यात

लाच घेताना अटक,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

अपहरणाच्या गुन्ह्याच्या तपासात मदत करण्याच्या मोबदल्यात संशयिताच्या भावाकडून ७ हजार रुपयांची लाच घेताना सहायक पोलिस निरीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. सागर गंगाराम डगळे असे पकडलेल्या सहायक निरीक्षकाचे नाव असून, तो उपनगर पोलिस ठाण्यात कार्यरत आहे.

एका संशयिताविरोधात अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातील संशयितास तपासादरम्यान मदत करण्याच्या मोबदल्यात तपासी अधिकारी सागर डगळे याने संशयिताच्या भावाकडे २५ हजार रुपयांची लाच मागितली. तडजोड करून सागरने दहा हजार रुपयांची मागणी केली. दरम्यान, तक्रारदाराने सागर यास ऑनलाइन पद्धतीने तीन हजार रुपये दिले होते. सागरविरोधात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार विभागाने सापळा रचला. बुधवारी (दि. ३) सकाळपासून सागरने तक्रारदारास पैसे देण्यासाठी विविध ठिकाणी बोलवले, मात्र भेटला नाही. अखेर सायंकाळच्या सुमारास जिल्हा रुग्णालयाजवळ तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सागरला रंगेहाथ पकडले.

सागर डगळे यास २०२२ मध्ये पदोन्नती मिळाली. विशेष सुरक्षा विभागाच्या निवड यादीत त्याचा समावेश करण्यात आला होता. मात्र, प्रतिनियुक्तीचे आदेश नसल्याने उपनगर पोलिस ठाण्यात कार्यरत असल्याचे समजते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अनिल बागूल व त्यांच्या पथकाने सापळा रचून सागरला पकडले.

हेही वाचा :

The post नाशिक : सहायक पोलिस निरीक्षक लाच घेताना जाळ्यात appeared first on पुढारी.