Site icon

नाशिक : साखर कारखान्याच्या मळीने शेती धोक्यात

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
कोपरगाव तालुक्यातील गौतमनगर (कोळपेवाडी) येथील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या डिस्टिलरी विभागाचे मळी स्पेंट वॉशचे दूषित पाणी सिन्नर तालुक्यातील कोळगावमाळ शिवारातील कारखान्याच्या मालकीच्या जागेत टाकले जात असल्याने लगतच्या परिसरातील शेतकर्‍यांच्या विहिरीचे पाणी पिण्यायोग्य राहिले नसल्याची तक्रार शेतकर्‍याने केली आहे. सदर मळीचे पाणी विहिरीत उतरत असल्याने शेतीही धोक्यात आली आहे. कारखान्याने तत्काळ उपाययोजना करावी अन्यथा आत्मदहन करण्याचा इशारा संबंधित शेतकर्‍याने दिला आहे.

सदर विहिरीतील पाणी दूषित असल्याचा अहवाल भूजल सर्वेक्षण विभागाने शेतकर्‍यास दिला आहे. शेतकर्‍याच्या कुटुंबासह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचे हाल होत असल्याने कारखान्याला दूषित पाणी टाकण्यास प्रतिबंध करावा, अशी मागणी कोळगावमाळ येथील शेतकरी संपत गवांदे यांनी केली. याबाबत विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांना मागणीचे निवेदन दिले आहे. तथापि दखल घेतली जात नसल्याने गवांदे यांनी कुटुंबासह आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. कारखाना त्यांच्या मालकीच्या शेतात मळीचे दूषित पाणी ओतत असला तरी परिसरातील शेतीवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. याबाबत वेळोवेळी अधिकार्‍यांना निवेदने देऊनही दखल घेत नसल्याने गवांदे यांनी कंटाळून आत्मदहनाचा इशारा देत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. भूजल सर्वेक्षण विभागाकडेही याबाबत तक्रार करण्यात आली होती. गवांदे यांच्या विहिरीतील पाण्याचे नमुने घेतल्यानंतर त्याच्या रासायनिक व जैविक तपासण्या करण्यात आल्या. पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा अहवाल देण्यात आला आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नाशिक उपप्रादेशिक कार्यालयातही गवांदे यांनी तक्रार केली. विभागाच्या अहमदनगर व नाशिक अधिकार्‍यांनी संयुक्त पाहणी करून कारखान्यास नोटीस बजावली असली तरी दोन महिने उलटले असून, दूषित पाणी टाकणे अजूनही बंद झालेले नसल्याचे गवांदे यांनी सांगितले.

हेही वाचा:

The post नाशिक : साखर कारखान्याच्या मळीने शेती धोक्यात appeared first on पुढारी.

Exit mobile version