नाशिक : साडेतीन लाख विद्यार्थी देणार दहावी-बारावी बोर्डाची परीक्षा

परीक्षा www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेची तयारी सुरू आहे. दहावीच्या परीक्षेसाठी नाशिक विभागातून १ लाख ६२ हजार ६१२, तर बारावीसाठी १ लाख ९७ हजार १४८ अशा एकूण ३ लाख ५९ हजार ७६० विद्यार्थांनी परीक्षेसाठी अर्ज केले आहेत. इयत्ता बारावीच्या परीक्षा २१ फेब्रुवारी ते २१ मार्च २०२३, तर इयत्ता दहावीच्या परीक्षा २ ते २५ मार्च २०२३ या कालावधीत पार पडणार आहेत.

दहावी, बारावीची परीक्षा देऊ इच्छिणा-या विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी माध्यमिक व राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाने विलंब, अतिविलंब शुल्कासह अर्ज दाखल करण्याची संधी उपलब्ध करून दिली होती. जिल्ह्यातून दहावी परीक्षेसाठी आत्तापर्यंत ९१ हजार ५८०, तर बारावीसाठी ७४ हजार ७८० अर्ज दाखल केले आहेत, तर मंडळाच्या नाशिक विभागात समावेश असलेल्या नाशिकसह धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यांचा विचार करता, विभागातून बारावीसाठी १ लाख ९७ हजार १४८, तर दहावीसाठी १ लाख ६२ हजार ६१२ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत.

काही दिवसांपूर्वी इयत्ता दहावी, बारावीच्या लेखी परीक्षेचे संभाव्‍य वेळापत्रक जाहीर केले होते. यासंदर्भात हरकती, तक्रारी मागविताना त्‍याआधारे अंतिम परीक्षा वेळापत्रक नुकतेच शिक्षण मंडळाने जाहीर केले आहे. प्रात्‍यक्षिक परीक्षा, श्रेणी तोंडी परीक्षा व अन्‍य विषयांच्‍या परीक्षांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना कळविण्यात येणार आहे. दरम्यान, यंदा परीक्षेत संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित प्रश्‍न विचारले जाणार आहेत. तसेच गुणांनुसार निर्धारित वेळ दिला जाणार असून, यंदा वाढीव वेळ दिला जाणार नाही. या बदलांचा अंदाज घेत विद्यार्थ्यांकडून परीक्षेची तयारी केली जात आहे.

जिल्हानिहाय——विद्यार्थी——संख्या

जिल्‍हा——बारावी——दहावी

नाशिक——७४,७८०——९१,५८०

धुळे——२३,८७९——२८,४१०

जळगाव——४७,२१४——५६,८१७

नंदुरबार——१६,७३९——२०,३४१

एकूण——१,६२,६१२——१,९७,१४८

हेही वाचा :

The post नाशिक : साडेतीन लाख विद्यार्थी देणार दहावी-बारावी बोर्डाची परीक्षा appeared first on पुढारी.