नाशिक : साडे सात हजार स्मार्ट वॉटर मीटर बसविणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महानगरपालिकेच्या समन्वयाने नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. मार्फत प्रायोगिक तत्त्वावर व्यावसायिक व अनिवासी ग्राहक यांच्यासाठी (लो रेंज वाइड एरिया नेटवर्क) स्मार्ट वॉटर मीटर बसविण्यात येणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर जवळपास ७,४४७ स्मार्ट वॉटर मीटर येत्या ३ ते ६ महिन्यांमध्ये बसविण्याची योजना नाशिक स्मार्ट सिटीने आखली आहे.

नाशिक हे महाराष्ट्रातील काही शहरामधील एक असे शहर आहे की, जे केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी मिशनच्या अनुषंगाने कार्यक्रम राबवित आहे. वाढत्या पाण्याच्या मागणीची पूर्तता करण्याकामी आणि भविष्यातील संभाव्य पाण्याच्या संकटाशी सामना करण्यासाठी स्मार्ट सिटीने आपल्या रहिवाशांना सतत पाणीपुरवठा करता येईल, याची खात्री करण्यासाठी पाणी वितरण प्रकल्प सुरू केला आहे. मॅन्युअल मीटर रीडिंग पद्धती कमी करणे, मीटर रीडिंगमधील विसंगती कमी करणे, बिलिंगची कार्यक्षमता वाढविणे, पाण्याच्या वापरासंबंधी नियोजनात पारदर्शकता आणणे ही नाशिक स्मार्ट सिटीची उद्दिष्टे आहेत.

नाशिक शहराला जलसंवर्धनाच्या दृष्टीने शाश्वत आणि स्वयंपूर्ण शहर करण्याच्या दिशेने हे पहिले पाऊल असेल.

– सुमंत मोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी, नाशिक स्मार्ट सिटी

हेही वाचा : 

The post नाशिक : साडे सात हजार स्मार्ट वॉटर मीटर बसविणार appeared first on पुढारी.