नाशिक : सातपूरला भटक्या श्वानांचा उपद्रव वाढला; नागरिक धास्तावले

Satpurwww.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सातपूर, श्रमिकनगर परिसरात भटक्या श्वानाने चिमुकल्यास चावा घेत जखमी केल्याची घटना घडली आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या घटनेत श्वानाने चिमुकल्याला काही अंतरापर्यंत फरपटत नेले. भरवस्तीत घडलेल्या या घटनांमुळे नागरिक चांगलेच धास्तावले असून, भटक्या श्वानांचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. याबाबत अमोल पाटील यांनी अतिरिक्त आयुक्त अशोक अत्राम यांना निवेदन दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, महापालिकेच्या प्रशासन काळातील अधिकारी आणि ठेकेदाराच्या मुजोर कारभाराचा नागरिकांना फटका बसत आहे. सातपूर, गंगापूर परिसरात भटक्या श्वानांचा वावर वाढला आहे. भटके श्वान टोळक्याने जनावरे अन् लहानग्यांवर हल्ले करीत आहेत. मनपाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सोनवणे यांना याबाबत अनेक वेळा माहिती देऊनदेखील कुठलीच कारवाई केली जात नाही. उलट त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यास अतिशय असंस्कृत भाषेत उत्तर दिले जाते. त्याचबरोबर या भागात कोठेही पेस्ट कंट्रोल व औषध फवारणीचे काम होत नाही. त्यामुळे परिसरात डेंग्यूसारख्या आजाराने डोके वर काढले आहे. त्यामुळे मोकाट श्वानांचा बंदोबस्त केला जावा, अशी मागणीही भाजप युवा मोर्चाचे शहर उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी निवेदनाद्वारे केली.

हेही वाचा:

The post नाशिक : सातपूरला भटक्या श्वानांचा उपद्रव वाढला; नागरिक धास्तावले appeared first on पुढारी.