Site icon

नाशिक : सातपूर येथील कामगार विमा रुग्णालयाच्या कर्मचारी वसाहतीला अवकळा

नाशिक : सतीश डोंगरे
सातपूर परिसरातील कामगार विमा रुग्णालयाच्या (ईएसआयसी) कर्मचार्‍यांची 105 सदनिकांची वसाहत आहे. मात्र, या वसाहतीत सुविधांच्या नावाने बोंब असल्याने, अवघे 38 कर्मचारीच या ठिकाणी वास्तव्यास आहेत. वरवर केलेले रंगकाम, अस्वच्छता, खिडक्यांच्या काचांची मोडतोड, दुर्गंधी आदींमुळे येथील कर्मचारी अन्यत्र स्थलांतरित होत असल्याची स्थिती आहे.

कामगारांना उपचार उपलब्ध व्हावेत याकरिता कामगार विमा रुग्णालयाची उभारणी करण्यात आली. रुग्णालयाला लागूनच कर्मचार्‍यांसाठी 105 सदनिकांची वसाहतही उभारली. मात्र, या वसाहतीत पुरेशा सुविधा नसल्याने कर्मचारी या ठिकाणी वास्तव्य करण्यास नकार देत असल्याची स्थिती आहे. तर जे कर्मचारी या ठिकाणी वास्तव्यास आहेत, त्यांना सुविधांअभावी अडचणींचा सामना करावा लागत असल्याची स्थिती आहे. वसाहतीतील 10 इमारतींमध्ये 120 खोल्या बांधण्यात आल्या आहेत. कामगार रुग्णालयात महिला व पुरुष कामगार रुग्णांसाठी स्वतंत्र 100 खाटांची व्यवस्थाही करण्यात आलेली आहे. परंतु, शासकीय यंत्रणा पुरेशा सुविधा पुरविण्यात अपयशी ठरत असल्याने कामगार विमा रुग्णालय आणि वसाहत समस्यांनी वेढली आहे. येथील वसाहतीत 10 हून अधिक इमारती कामगार रुग्णालयात काम करणारे डॉक्टर व कर्मचार्‍यांसाठी उभारण्यात आल्या होत्या. मात्र, जुन्या झालेल्या इमारतींना वरवर रंगकाम केलेले असले, तरी परिसरातील अस्वच्छतेमुळे अनेकांनी दुसरीकडे राहणे पसंत केले आहे. केवळ निवडक कर्मचारीच कामगार विमा रुग्णालयाच्या इमारतींमध्ये वास्तव्य करीत आहेत.

आमदार निधीतून रस्ते
ईएसआयसी कर्मचार्‍यांच्या वसाहतीत रस्त्यांची मोठी समस्या होती. कर्मचार्‍यांसह येथे येणार्‍या रुग्णांनादेखील खडतर प्रवास करावा लागत असे. रस्त्यांचे काम व्हावे अशी मागणी रुग्णांसह कर्मचारी करीत होते. आमदार सीमा हिरे यांच्या आमदार निधीतून वसाहतीत क्राँकीटचे रस्ते उभारण्यात आले आहेत. त्यामुळे रस्त्यांचा प्रश्न बर्‍यापैकी मार्गी लागला आहे. मात्र, इतर असुविधा कायम आहेत.

मेंटेनन्सची कामे एजन्सीमार्फत
19 एप्रिल 2023 पर्यंत ईएसआयसी कर्मचारी वसाहतीच्या देखभाल दुरुस्तीची कामे ईएसआयसी क्षेत्रिय कार्यालय मुंबईच्या माध्यमातून केली जात होती. मात्र, आता आयुक्तांच्या आदेशान्वये ही कामे नाशिकच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून करण्याबाबतच्या हस्तांतरणाची कारवाई सुरू आहे. आश्चर्याची बाब म्हणजे जोपर्यंत या वसाहतीतील रहिवाशांकडून असुविधांची तक्रार केली जात नाही, तोपर्यंत त्या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नाहीत. तक्रारीनंतरही कामे मार्गी लागायला बराच वेळ लागत असल्याचे कर्मचार्‍यांचे म्हणणे आहे.

उद्यान नावालाच
कामगार विमा रुग्णालयात काम करणारे डॉक्टर व इतर कर्मचार्‍यांच्या मुलांसाठी उद्यानाचीही उभारणी करण्यात आलेली आहे. परंतु, कामगार विमा रुग्णालयाचे उद्यान हरवले की काय, असा प्रश्न पडतो. उद्यान उभारले खरे; परंतु ते केवळ नावालाच उरले असल्याचे प्रत्यक्ष पाहिल्यावर दिसते. कारण मोकळ्या जागेव्यतिरिक्त या ठिकाणी उद्यानासारखे काहीही दिसून येत नाही. महापालिका शासकीय इमारतींमध्ये राहणार्‍यांना मूलभूत सुविधा देते. कामगार विमा रुग्णालय आवारातील इमारतींमध्ये राहणार्‍या रहिवाशांनाही अशा सुविधा द्याव्यात, अशी मागणी होत आहे.

कचर्‍याचे ढीग अन् दुर्गंधी
वसाहतीतील इमारतीच्या मागच्या बाजूने कचर्‍याचे मोठमोठे ढीग दिसून येतात. हा कचरा उचलला जात नसल्याने तो कुजून त्याची दुर्गंधी येत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे कामगार रुग्णांच्या आरोग्याची निगा राखणार्‍या कर्मचार्‍यांनाच दुर्गंधीत वास्तव्य करावे लागत असल्याचे चित्र आहे. वसाहतीतील कचरा तत्काळ उचलण्यात यावा, अशी मागणी कर्मचार्‍यांकडून केली जात आहे.

The post नाशिक : सातपूर येथील कामगार विमा रुग्णालयाच्या कर्मचारी वसाहतीला अवकळा appeared first on पुढारी.

Exit mobile version