नाशिक : सार्वजनिक जागेत कचरा टाकला म्हणून दहा हजाराचा दंड 

नाशिकरोड: पुढारी वृत्तसेवा

गाडीतून आणलेला कचरा टाकल्याप्रकरणी एकाकडून महापालिका कर्मचा-यांनी दहा हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. नितीन झगडे असे कचरा टाकणा-याचे  नाव असल्याची माहिती महापालिका सूत्रांनी दिली. या व्यक्तीने नाशिकरोडच्या सार्वजनिक जागेच्या आनंदनगरमधील ईगल स्पोटर्ससमोरील मैदान परिसरात कचरा टाकला होता.

आयुक्तांच्या आदेशानुसार उपायुक्त दिलीप मेणकर, घनकचरा विभागाचे डॉ. आवेश पलोड यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय अधिकारी सुनिल आव्हाड, विभागीय स्वच्छता निरीक्षक अशोक साळवे, स्वच्छता निरीक्षक राजू निरभवणे, स्वच्छता मुकादम विजयपाल बहेनवाल आदींच्या पथकाने ही कारवाई केली. आनंदनगरमध्ये ईगल स्पोर्ट्ससमोर मोठे मैदान असून त्यात काटेरी झाडे झुडपे मोठ्याप्रमाणात वाढले आहेत. या मैदानाचा उपयोग डंपिंग ग्राउंड म्हणून केला जात आहे. कचरा, डेब्रिस, मृत जनावरे आणून टाकली जात असल्याने रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. बुधवारी, दि.28 एका वाहनातून कचरा टाकला जात असल्याची माहिती मिळताच प्रभाग २१ मधील धोंगडेनगर हजेरी शेडच्या कर्मचार्‍यांनी दहा हजाराची दंडात्मक कारवाई केली. डेब्रिस व सणासुदीचे टाकाऊ साहित्य नागरिकांनी घंटागाडीत द्यावे, असे आवाहन विभागीय स्वच्छता निरीक्षक अशोक साळवे यांनी केले आहे. प्लॅस्टिकबाबतही कारवाई सुरु आहे.

अशा प्रकारे होणार कारवाई : पहिल्यांदा प्लॅस्टिक सापडल्यास पाच हजार, दुसर्‍या प्रकरणात दहा हजार तर तिसर्‍या प्रकरणात 25 दंड व कारावासाची शिक्षा केली जात आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकणार्‍यांना एक हजार दंड केला जात असल्याचे सांगण्यात आले आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : सार्वजनिक जागेत कचरा टाकला म्हणून दहा हजाराचा दंड  appeared first on पुढारी.