नाशिक : साल्हेर किल्ल्यावरून पडून युवकाचा मृत्यू

साल्हेर किल्ला पडून एकाचा मृत्यू,www.pudhari.news

सटाणा (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील साल्हेर किल्ल्यावर पर्यटनासाठी आलेल्या मालेगावच्या एका युवकाचा किल्ल्यावरून पडून दुर्दैवी मृत्यू झाला. तर एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. शुक्रवारी (दि.15) दुपारी ही घटना घडली. जखमीला उपचारार्थ रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

राज्यातील सर्वोच्च किल्ला साल्हेरवर पावसाळी पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली आहे. शुक्रवारी (दि.15) मालेगाव येथील बारा युवकांचा समूह पर्यटनासाठी आला. या समूहाने अवघड असलेल्या साल्हेरवाडीकडून चढायला सुरुवात केली. सातव्या दरवाजाजवळ अवघड ठिकाणी पायर्‍यांच्याद्वारे चढाई करत असताना भावेश शेखर अहिरे (21) या तरुणाचा याठिकाणी पाय घसरून तो दरीत कोसळला. त्याचा मृतदेह पाठीमागील पायथ्याला असलेल्या मगरबारीतील गणेश मंदिराजवळ मिळून आला. त्याच्यासोबतच मनीष सुनील मुठेकर (21) हादेखील याच ठिकाणाहून कोसळला. परंतु सुदैवाने तो झाडाझुडपांमध्ये अडकून घसरत पडला. त्याच्या दोन्हीही पायांना गंभीर दुखापती झाल्या आहेत. घटनेबाबत युवकांनी मोबाइलद्वारे मालेगाव येथे माहिती दिली. साल्हेरचे सरपंच मधुकर भोये यांनीदेखील याबाबत जायखेडा पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार मालेगावचे अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांनी घटनास्थळी दाखल होत मदतकार्य सुरू केले. जायखेडा पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी केलेल्या शोधकार्यात स्थानिकांच्या मदतीने जखमी युवकास शोधले.

हेही वाचा :

The post नाशिक : साल्हेर किल्ल्यावरून पडून युवकाचा मृत्यू appeared first on पुढारी.