सिंहस्थ कुंभमेळ्यात येणाऱ्या कोट्यवधी साधू-महंत व भाविकांच्या पाणीपुरवठा व्यवस्थापनासाठी नाशिक महापालिकेने तब्बल एक हजार कोटींचा मास्टर प्लॅन तयार केला आहे. या अंतर्गत सिंहस्थ काळात तपोवनात उभारण्यात येणाऱ्या साधुग्राममध्ये तब्बल २४० कोटींच्या नवीन जलवाहिन्यांचे जाळे विस्तारले जाणार असून, मुकणे धरण थेट पाइपलाइन योजनेच्या दुसऱ्या टप्प्यांतर्गत विल्होळी जलशुद्धीकरण केंद्रांपासून पंचवटी विभागात ३१५ कोटींची नवीन जलवाहिनी टाकली जाणार आहे.
२०२७-२८ मध्ये नाशकात होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी महापालिकेच्या विविध विभागांमार्फत प्राथमिक सिंहस्थ आराखडा तयार केला जात आहे. सिंहस्थ काळात येणाऱ्या कोट्यवधी भाविकांना पिण्याचे पाणी पुरविण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता, पाणीपुरवठा व्यवस्थेचे सक्षमीकरण गरजेचे आहे. त्यातच सिंहस्थ काळात येणाऱ्या भाविकांमुळे महापालिकेच्या अस्तित्वातील पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेवर ताण पडणार आहे. त्यामुळे सिंहस्थाच्या अनुषंगाने महापालिकेला पाणीपुरवठा यंत्रणेची क्षमतावाढही करावी लागणार आहे. त्या दृष्टीने महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने आराखडा तयार केला आहे. सिंहस्थ काळात साधू-महंतांच्या आखाड्यांकरिता तपोवनात साधुग्रामची उभारणी केली जाते. लाखोंच्या संख्येने साधू-महंत या ठिकाणी वास्तव्यास येतात. त्यामुळे साधुग्रामध्ये पाणीपुरवठ्याच्या व्यवस्थापनाची प्रमुख जबाबदारी महापालिकेवर असणार आहे. त्यासाठी साधुग्राम येथे २० दशलक्ष लिटर क्षमतेचे २० मीटर उंचीचा जलकुंभ उभारला जाणार आहे. यासाठी पाच कोटींचा खर्च अपेक्षित आहे. साधुग्राम व भाविक मार्गांवर पाणीपुरवठ्यासाठी २४० कोटी रुपये खर्चातून जलवाहिन्यांचे जाळे निर्माण केले जाणार आहे. साधुग्रामकडे येणारे रस्ते व पार्किंगच्या जागेत २५ कोटी रुपये खर्चातून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जाणार आहे.
सिंहस्थ काळात गंगापूर धरणातून अतिरिक्त पाण्याचे पंपिंग करावे लागेल. त्यासाठी गंगापूर धरणातील पंपिंग स्टेशन येथे १५ कोटी रुपये खर्चातून नवीन पंपिंग मशीनरी बसविली जाणार आहे. सिंहस्थ काळात मुकणे धरणाचे महत्त्व अधोरेखित होणार आहे. मुकणे धरणातून अतिरिक्त पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यासाठी मुकणे धरण थेट पाइपलाइन योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचे काम हाती घेतले जाणार आहे. यात २५ कोटी रुपये खर्चातून मुकणे धरणाच्या पंपिंग स्टेशनमध्ये वाढीव क्षमतेची मशीनरी बसविली जाणार आहे. विल्होळी जलशुद्धीकरण केंद्राच्या क्षमतावाढीअंतर्गत १३७ दशलक्ष लिटर क्षमतेचे नवीन जलशुद्धीकरण केंद्र उभारले जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यांतर्गत मुकणेचे पाणी थेट पंचवटी विभागापर्यंत पोहोचविले जाणार आहे. त्यासाठी विल्होळी ते पंचवटी या दरम्यान ३१५ कोटींची नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम प्रस्तावित आहे. दारणा धरणातूनही नाशिकरोड विभागात पाणीपुरवठा करण्यासाठी ३०० कोटींची थेट जलवाहिनी टाकली जाणार आहे.
असा आहे पाणीपुरवठ्याचा मास्टर प्लॅन
* साधुग्राम येथे २० दललि क्षमतेचा २० मीटर उंचीचा जलकुंभ – ५ कोटी
* साधुग्राम व भाविक मार्ग येथे जलवाहिन्या – २४० कोटी
* साधुग्रामकडे येणारे रस्ते व वाहनतळांच्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था – २५ कोटी
* गंगापूर धरणासाठी नवीन पंपिंग मशीनरी बसविणे – १५ कोटी
* विल्होळी जलशुद्धीकरण केंद्राची क्षमतावाढ (१३७ दललि) – ७५ कोटी
* मुकणे डॅम येथे वाढीव क्षमतेची पंपिंग मशीनरी – २५ कोटी
* विल्होळी ते पंचवटी नवीन जलवाहिनी – ३१५ कोटी
* दारणा धरणातून थेट जलवाहिनी – ३०० कोटी
——
पाणीपुरवठ्याची सद्यस्थिती
नाशिक शहराची लोकसंख्या : अंदाजे २२ लाख
धरणांतून दररोज होणारे रॉ वॉटर पंपिंग : सुमारे ५५५ दशलक्ष लिटर प्रतिदिन
अस्तित्वातील जलशुद्धीकरण केंद्रांची संख्या : ७
जलशुद्धीकरण केंद्रांची क्षमता : ६०९ दशलक्ष लिटर प्रतिदिन
अस्तित्वातील जलकुंभांची एकूण संख्या : ११९
जलकुंभांची साठवण क्षमता – १९४ दशलक्ष लिटर
रॉ वाटर पाइपलाइनची लांबी – ८३ किलोमीटर
शहरातील जलवाहिन्यांची लांबी – २५०२ किलोमीटर
दररोजचा पाणीपुरवठा : सरासरी ५३० दशलक्ष लिटर प्रतिदिन
अस्तित्वातील जलशुद्धीकरण केंद्रांची माहिती
शिवाजीनगर, बाराबंगला, पंचवटी, निलगिरीबाग, नाशिकरोड, गांधीनगर, विल्होळी जलशुद्धीकरण केंद्र
हेही वाचा :
- कर्जत : न्यायाधीश निवासस्थानासाठी 1.33 कोटी
- Pizza Garden : पिझ्झा गार्डन! काय आहे हा प्रकार?
- हरियाणातील नूहमध्ये तब्बल १३ दिवसांनी इंटरनेट सेवा पूर्ववत
The post नाशिक : सिंहस्थातील पाणी व्यवस्थापनासाठी हजार कोटींचा मास्टर प्लॅन appeared first on पुढारी.