नाशिक : सिंहस्थ आराखडा तयार करण्याचे आयुक्तांचे निर्देश

कुंभमेळा नाशिक

नाशिक: पुढारी वृत्तसेवा

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी महापालिकेने सुरू केली आहे. यासाठी सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्याचे निर्देश आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी दिले आहेत. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त तथा सिंहस्थ आराखडा समन्वय समितीचे उपाध्यक्ष प्रदीप चौधरी यांनी विभागप्रमुखांची बैठक घेत आवश्यक सिंहस्थ कामांच्या माहितीचा अहवाल येत्या पंधरा दिवसांत सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

नाशिकमध्ये येत्या २०२७-२८ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या सूचनेनुसार तत्कालिन आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली सिंहस्थ आराखडा समन्वय समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीकडे साधुग्रामच्या जागेचे नियोजन, आरक्षण व अधिग्रहण यावर चर्चा करण्यासह सिंहस्थ काळात येणाऱ्या लाखो साधू-महंत व भाविकांना विविध सेवा सुविधा पुरविण्यासाठी हाती घेण्यात येणाऱ्या सिंहस्थ कामांचा आराखडा तयार करण्याची जबाबदारी आहे. केंद्र व राज्य शासनाकडून सिंहस्थ कामांसाठी निधी मागितला जाणार आहे. सिंहस्थ कामांचा सविस्तर आराखडा तयार करण्यासाठी सल्लागार संस्थेची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु, राज्यात तसेच पालिकेत सुरू असलेल्या राजकीय संगीत खुर्चीमुळे हा विषय पुढे सरकला नाही. आता पालिकेला नियमित आयुक्त म्हणून डॉ. करंजकर रुजू झाल्यानंतर त्यांनी सिंहस्थाच्या नियोजनाला प्राधान्य दिले आहे. महापालिकास्तरावर सिंहस्थासाठी स्वतंत्रपणे डीपीआर तयार करण्याचे निर्देश आयुक्तांनी समन्वय समितीला दिले आहेत. त्यानुसार चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत सिंहस्थ कामांच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. महापालिकेच्या विविध विभागांमार्फत कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारीची कोणती कामे केली पाहिजे, मोठ्या कामांचे आराखडे तयार करणे, आराखड्यानुसार नियोजन अंमलबजावणी करणे, उपाययोजना करणेबाबत चर्चा झाली.

…अशी आहे समन्वय समिती

सिंहस्थ कुंभमेळा समन्वय अधिकारी म्हणून शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी अतिरिक्त आयुक्त शहर यांची नियुक्ती केली असून, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, मुख्य लेखापरीक्षक, उपआयुक्त (प्रशासन) उपआयुक्त (अतिक्रमण), उपसंचालक, नगर नियोजन, अधीक्षक अभियंता, सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी, अधीक्षक अभियंता, यांत्रिकी व विद्युत वैद्यकीय(आरोग्य) अधिकारी, घनकचरा व्यवस्थापन संचालक, मिळकत व्यवस्थापक, मुख्य अग्निशामक अधिकारी, स्मार्ट सिटी मुख्य कार्यकारी अधिकारी व पदसिद्ध सचिव म्हणून शहर अभियंता यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आयुक्तांच्या सुचनेनुसार सिंहस्थासाठी तयार केलेल्या समन्वय समितीची बैठक शुक्रवारी घेण्यात आली. आयुक्तांनी प्राथमिक डीपीआर तयार करण्याचे निर्देश दिले असून, त्यानुसार सिंहस्थाशी संबंधित सर्व विभागांना १५ दिवसांत यासंदर्भातील अत्यावश्यक सुविधांबाबतची माहिती सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

-प्रदीप चौधरी, अतिरिक्त आयुक्त, मनपा

हेही वाचा :

The post नाशिक : सिंहस्थ आराखडा तयार करण्याचे आयुक्तांचे निर्देश appeared first on पुढारी.