नाशिक : सिटीआर कंपनीच्या प्रशिक्षण केंद्रात अवतरला बिबट्या; सुरक्षारक्षकांवर चढवला हल्ला

बिबट्या www.pudhari.news

नाशिक; पुढारी वृत्तसेवा: मुकणे परिसरातील सिटीआर कंपनीच्या प्रशिक्षण केंद्राच्या आवारात रात्री साडेदहाच्या सुमारास बिबट्या आपल्या पिलांना घेऊन आला. त्याने सुरक्षारक्षकांवर हल्ला चढवला, मात्र तो सुदैवाने बचावला. नाशिक पासून जवळ असणाऱ्या मुकणे भागात सिटीआर कंपनीचे नॉलेज एन्व्हासमेंट हे प्रशिक्षण केंद्र आहे. हा परिसर मोठा असून भरपूर झाडीही आहे.

तेथे 22 नोव्हेंबर रोजी रात्री 10.30 वाजता अचानक बिबट्या आपल्या लहान पिल्लासह आला. सुरक्षा रक्षक सुनील सिंग यांना त्याची चाहूल लागली तोच बिबट्याने त्यांच्या केबिनवर हल्ला चढवला. केबिनचा दरवाजा बंद असल्याने सुरक्षा रक्षक सिंग त्या हल्ल्यातून बचावले त्याने बिबट्यावर टॉर्च मारताच बिबट्या हळुवारपणे आपल्या पिल्लाला घेऊन निघून गेला. बिबट्या आवारात येत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.

आमच्या कंपनीच्या प्रशिक्षण केंद्रात दुसऱ्यांदा बिबटयाचे दर्शन झाले. याआधी पाच ते सहा दिवसांपूर्वी रात्री दिसला होता. तो लगेच गायब झाला मात्र यावेळी तो या आवारात बराच वेळ होता. सुरक्षारक्षकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. आम्ही नाशिकच्या वनविभागाकडे ही माहिती दिली आहे.
                – बी.के.चक्रवर्ती, व्यवस्थापक, सिटीआर मॅन्युफॅक्चरिंग लिमिटेड नाशिक

The post नाशिक : सिटीआर कंपनीच्या प्रशिक्षण केंद्रात अवतरला बिबट्या; सुरक्षारक्षकांवर चढवला हल्ला appeared first on पुढारी.