Site icon

नाशिक : सिटीलिंकची सेवा पाच तास ठप्पं

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
कामावरून कमी केलेल्या सहकार्‍यांच्या समर्थनार्थ गुरुवारी (दि. 11) सिटीलिंकच्या नाशिकरोड डेपोतील कर्मचार्‍यांनी आक्रमक पवित्रा घेत केलेल्या आंदोलनामुळे नाशिकरोडला तब्बल पाच तास सेवा ठप्प होऊन प्रवाशांना पुन्हा एकदा मनस्ताप सहन करावा लागला. ठेकेदाराने अखेर कमी केलेल्या पाच ते सहा चालकांना पुन्हा कामावर रुजू केल्याने आंदोलन मागे घेतल्याने शहर बससेवा पूर्ववत झाली.

सिटीलिंकमध्ये ठेकेदारामार्फत वाहक-चालकांची नेमणूक केली जाते. नाशिकरोड डेपोतील पाच ते सहा चालकांना ठेकेदाराने उद्धट वर्तणुकीचे कारण देत कामावरून कमी केले असता इतर कर्मचार्‍यांनी आक्रमक पवित्रा घेत त्यांना तत्काळ कामावर रुजू करावे, अशी मागणी केली. तसेच कामबंद आंदोलन सुरू केले. त्यामुळे सकाळी 7 पासूनच सिटीलिंकची सेवा पूर्णत: ठप्प झाली होती. यामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. सकाळच्या सुमारास अनेकांना कामावर जाण्याची घाई असते. मात्र, अचानकच बसेस बंद असल्याचे समजल्याने अनेकांनी मिळेल त्या खासगी वाहनाने स्थळ गाठले. त्याचबरोबर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनाही या संपाचा मोठा फटका बसला. दुपारी 12.30 पर्यंत हा सर्व प्रकार सुरू असल्याने अनेकांना मनस्ताप सहन करावा लागला. दरम्यान सिटीलिंकच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी कर्मचार्‍यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या चालकांना कामावर पुन्हा रुजू करेपर्यंत कामबंद आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा कर्मचार्‍यांनी पवित्रा घेतल्याने अखेर त्या सर्व चालकांना कामावर रुजू करून घेण्यात आले. त्यानंतर बससेवा पूर्ववत झाली. दरम्यान, सिटीलिंकच्या सततच्या कामबंद आंदोलनाचा प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून, सिटीलिंकने या प्रकारांना आळा घालण्याची गरज असल्याची भावना नाशिककरांकडून व्यक्त होत आहे. काही दिवसांपूर्वीच वाहकांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन पुकारत सिटीलिंकची सेवा ठप्प केली होती.

उद्धट वर्तणुकीमुळे या कर्मचार्‍यांना कामावरून कमी केले होते. कर्मचार्‍यांच्या कामबंद आंदोलनामुळे त्यांना पुन्हा कामावर रुजू केले. मात्र, या सर्व प्रकरणाची चौकशी होणार असून, पुढील सात दिवसांनंतर त्या कर्मचार्‍यांबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. – मिलिंद बंड, महाव्यवस्थापक, सिटीलिंक

हेही वाचा:

The post नाशिक : सिटीलिंकची सेवा पाच तास ठप्पं appeared first on पुढारी.

Exit mobile version