नाशिक : सिटीलिंकच्या धडकेत सासू-सून जखमी

Accident

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

दुचाकीवरून जाणाऱ्या दोन महिलांना सिटी लिंक बसने धडक दिल्याची घटना शुक्रवारी (दि.२४) घडली. यात दोन्ही महिलांना मुक्कामार लागला असून, याबाबत सिटीलिंककडे तक्रार करण्यात आली आहे.

सिटीलिंक बससेवेचे वेळापत्रक कोलमडू नये, याकरता भरधाव बसेस चालविल्या जात असल्यानेच यापूर्वीही अनेक अपघात बसचालकांकडून घडले आहेत. असे असताना नाशिक महानगर परिवहन महामंडळाकडून त्याची दखल घेतली जात नसल्याने अपघातांच्या घटना सुरूच आहेत. म्हसरूळ येथील रहिवासी प्रमिला बोराडे आणि स्नेहल बोराडे या सासू-सून दुचाकीने घराकडे जाताना म्हसरूळ सिग्नलवर त्यांना मागून आलेल्या एमएच १५, जीव्ही ७९४४ या बसने धडक दिली. त्यात दोन्ही महिला खाली पडून जखमी झाल्या. याबाबत बोराडे यांचे नातेवाइक मिलिंद राजगुरू यांनी सिटीलिंकचे चिफ आॅपरेशन व्यवस्थापक मिलिंद बंड यांच्याकडे तक्रार केली.

व्दारका परिसरातील सर्व्हिस रोडवरही सिटीलिंक बसच्या धडकेत पादचारी ठार झाल्याची घटना घडलेली आहे, असे असताना बसच्या वेगावर नियंत्रण आणण्याबाबत प्रयत्न केले जात आहे नाही किंवा सूचना दिली जात नाही, असा आरोप होत आहे.

दंड टाळण्यासाठी बसेस सुसाट

बससाठी ठरवून दिलेल्या वेळा पाळल्या नाही तर बसचालक आणि वाहकाकडून कंपनीमार्फत दंड आकारणी केली जाते. त्यामुळे चालक-वाहकही वेळा पाळण्यासाठी बस सुसाटपणे चालवतात. परंतु, त्यात नागरिक आणि वाहनधारकांना अपघातांना सामोरे जावे लागत असल्याने याबाबत महानगर परिवहन महामंडळाने तोडगा काढावा, अशी मागणी केली जात आहे.

म्हसरूळ येथील अपघाताबाबत माहिती समजली असून, संबंधितांशी संपर्क साधला. तसेच सर्व चालकांना वेगमर्यादेबाबत सूचना दिल्या जातील.

– मिलिंद बंड, चिफ आॅपरेशन मॅनेजर, सिटीलिंक

हेही वाचा :

The post नाशिक : सिटीलिंकच्या धडकेत सासू-सून जखमी appeared first on पुढारी.