नाशिक : सिटीलिंक कर्मचार्‍यांच्या सतर्कतेमुळे हरवलेली मुले आईवडिलांच्या कुशीत

हरवलेली मुले आईच्या कुशीत,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा 

दोन दिवसांपूर्वी मखमलाबाद येथील छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयातील हरवलेला मुलगा सिटीलिंक कर्मचार्‍यांच्या सतर्कतेमुळे त्याच्या आईवडिलांकडे सुखरूपपणे परत करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच सोमवारी (दि. ६) पुन्हा एकदा सिटीलिंक कर्मचार्‍यांच्या जागरूकतेमुळे दोन हरविलेली मुले आई- वडिलांच्या कुशीत विसावली आहेत.

सोमवारी (दि.६) सिन्नर तालुक्यातील माळेगाव फाटा येथील रहिवासी असलेली दोन मुले घरून पळून गेली होती. ही दोन मुले सख्खे भाऊ असून, हे दोघे रात्री आठच्या सुमारास सिटीलिंक बसमध्ये बसलेली होती. परंतु, बसमधील चालक व वाहकांना या दोन्ही मुलांबाबत संशय आल्याने त्यांनी या दोन्ही मुलांना घेऊन निमाणी बसस्थानक येथील वाहतूक नियंत्रक प्रवीण कांबळे यांच्याकडे सुपूर्द केले. ही दोन्ही मुले शालेय गणवेशात असल्याने त्यांची चौकशी करून शाळेशी संपर्क साधण्यात आला व त्यानंतर आई-वडिलांशी संपर्क साधण्यात आला. त्यानंतर रात्री उशिरा मुलांचे आईवडील निमाणी बसस्थानक येथे दाखल झाले. दोन्ही मुले सुखरूपरीत्या आईवडिलांकडे सुपूर्द करण्यात आली.

या घटनेनंतर आई-वडिलांनी आनंद व्यक्त करतानाच सिटीलिंक कर्माच्यार्‍यांचे आभार व्यक्त केले. तसेच एकाच आठवड्यात हरवलेल्या तीन मुलांना सिटीलिंक कर्मचार्‍यांच्या सतर्कता व जागरूकतेमुळे आईवडिलांकडे परत पाठविण्यात आल्याने सिटीलिंक कर्मचार्‍यांच्या कामाचेदेखील कौतुक करण्यात येत आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : सिटीलिंक कर्मचार्‍यांच्या सतर्कतेमुळे हरवलेली मुले आईवडिलांच्या कुशीत appeared first on पुढारी.