नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरातील उंटवाडी रोडवरील एका मॉलमध्ये बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळताच शहर पोलिसांनी लवाटेनगरमध्ये धाव घेतली. दोन तासांच्या प्रयत्नांनंतर पोलिसांच्या पथकाने बॉम्ब शोधून तो निकामी केला. त्यानंतर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
सिटी सेंटर मॉल नेहमी गजबजलेला असतो. मात्र गुरुवारी (दि. 20) दुपारी मॉल परिसरास अचानक पोलिसांनी वेढा दिला. त्यामुळे नागरिकांमध्ये काहीसा गोंधळ व घबराट उडाली होती. पोलिसांच्या शीघ्र कृती दलाने मॉलमधील नागरिकांना सुरक्षितरीत्या बाहेर काढत बॉम्बचा शोध सुरू केला. श्वान पथकाच्या मदतीने शोध घेत पार्किंगमधील एका वाहनात बॉम्ब असल्याचे निष्पन्न झाले. बॉम्बशोधक व नाशक पथकाने बॉम्ब निकामी केला.
ऐनवेळी उद्भवणाऱ्या दहशतवादी हल्ल्याला तोंड देण्यासाठी पोलिसांसह यंत्रणेची सज्जता तपासण्यासाठी गुुरुवारी सिटी सेंटर मॉल येथे मॉकड्रिल करण्यात आले. या मॉकड्रिलमध्ये गुन्हे शाखेचे उपआयुक्त प्रशांत बच्छाव, परिमंडळ एकच उपआयुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक आयुक्त डॉ. सीताराम कोल्हे, आनंदा वाघ, सिद्धेश्वर धुमाळ, सचिन बारी यांच्यासह गंगापूरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर, सरकारवाड्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप ठाकूर, अंबडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ, मुंबई नाकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक युवराज पत्की यांच्यासह शीघ्र कृती दल, दहशतवादविरोधी पथक, बीडीडीएस, अग्निशमन दल आणि जिल्हा रुग्णालयाच्या पथकाने सहभाग घेतला होता.
हेही वाचा :
- Irshalwadi Landslide Incident : इर्शाळवाडीवर दुःखाचा कडा; 16 मृत्युमुखी; शंभरावर गाडले गेल्याची भीती
- इर्शाळवाडी दुर्घटना : सगळी परिस्थिती हाताबाहेरची होती
- विरोधकांची कसोटी
The post नाशिक सिटी सेंटर मॉलमध्ये बॉम्ब असल्याच्या खबरीने उडाली धावपळ appeared first on पुढारी.