
नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा
विभागातील सामान्य, कष्टकरी आणि कामगार राहात असल्याने कोविड काळामध्ये दोन वर्षे कामधंदा नसल्यामुळे घरपट्टी-पाणीपट्टी व विविध करांमध्ये सर्व सिडकोवासीयांना 50 टक्के सवलत द्यावी आदी मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे मनपा सिडको विभागीय कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी मनपाविरोधी घोषणांनी परिसर दणाणला होता. यावेळी विभागीय अधीक्षकांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, सिडकोत सामान्य, कष्टकरी आणि कामगार राहात असल्याने कोविड काळामध्ये दोन वर्षे कामधंदा नसल्यामुळे घरपट्टी-पाणीपट्टी व विविध करांमध्ये सर्वांना 50 टक्के सवलत द्यावी, पाथर्डी फाटा येथील छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर सातत्याने डिजिटल, बॅनर उभारून विद्रूपीकरणाचा प्रयत्न होत असून, डिजिटल बॅनर उभारणार्यांवर दंडात्मक कारवाई करावी, चुंचाळे परिसरातील नागरिकांना मूलभूत सुविधांसह, आरोग्य प्राथमिक आरोग्य केंद्र तातडीने सुरू करावे, तेथील भाजीपाल्याचे ओटे तातडीने स्थानिक रहिवाशांना अल्पदरात उपलब्ध करून द्यावे, फाळके स्मारक व बुद्धस्मारकामध्ये सातत्याने वाढणारे गवत आणि घाणीचे साम्राज्य याची नियमित साफसफाई होण्यासाठी लवकरात लवकर नवीन निविदा काढावी, स्लम एरियातील विविध समस्यांचे निरसन करावे आदी मागण्यांचा समावेश आहे. यावेळी अंबड पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. उत्तर महाराष्ट्राचे महासचिव वामन गायकवाड, माजी स्थायी समिती सभापती संजय साबळे, संजय दोंदे, महिला जिल्हाध्यक्षा उर्मिला गायकवाड, बाळासाहेब शिंदे, जितेश शार्दूल, दीपचंद दोंदे, अरुण शेजवळ, भीमचंद चंद्रमोरे, संदीप काकळीज, प्रतिभा पानपाटील, अॅड. सुशांत परघरमोल, बाळासाहेब घायवटे, दीपक भंडारी आदी शहर व जिल्हा पदाधिकारी यांच्यासह सिडको विभागातील पदाधिकार्यांनी यात सहभाग नोंदविला होता.
प्रमुख मागण्या अशा…
दरवर्षी दि. 14 एप्रिल, 6 डिसेंबर, संविधान दिन व धम्मचक्र प्रवर्तकदिनी विशेष निधी उपलब्ध करून पाथर्डी फाटा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करावे, फाळके स्मारक आणि बुद्धलेणी या ठिकाणी प्रेमीयुगुलांचा बंदोबस्त करण्यासाठी विशेष सिक्युरिटी गार्डची नेमणूक करावी, गॅस पाइपलाइनसाठी जागोजागी खोदण्यात येणार्या रस्त्यांचे तातडीने डांबरीकरण करावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
हेही वाचा:
- सिंधुदुर्ग : माझ्या विचारांचा सरपंच दिला नाही तर निधी देणार नाही – नितेश राणे
- राम गोपाल वर्माचा अभिनेत्रीच्या पायाच्या किस घेण्याबद्दल केला खुलासा
- Twitter Tick : ब्ल्यूसह, गोल्ड, ग्रे रंगात ट्विटरचे व्हेरिफाईड अकाऊंट्स लॉन्च; जाणून घ्या काय आहे ‘या’ रंगांचा अर्थ
The post नाशिक : सिडकोत वंचित बहुजन आघाडीची निदर्शने appeared first on पुढारी.