नाशिक : सिन्नर तालुका झाला टँकरमुक्त

टँकर

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यात मागील वर्षी समाधानकारक पाऊस झाला व नंतर वेळोवेळी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे सर्वच भागातील भूजल पातळी व पाण्याच्या स्त्रोतांमध्ये अद्यापही मुबलक साठा शिल्लक आहे. उन्हाची तीव्रता वाढत असली तरी यंदा धुळवड (रामोशीवाडी) वगळता तालुक्यातील एकाही गावाला अद्याप पिण्याच्या पाण्याच्या टँकरची गरज भासलेली नाही.

गेल्या दोन वर्षांपासून तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्याने तालुका टँकरमुक्त असल्याचेच यातून दिसून येत आहे. आता उन्हाची तीव्रता वाढत चालली असून, एक दोन गावे वगळता तालुक्यातून अद्यापही टँकरच्या मागणीचे प्रस्ताव पंचायत समितीकडे दाखल झालेले नाहीत. मागील तीन वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणात टँकर सुरू होते. तथापि, यंदा टँकरची मागणी नसल्याने समाधान व्यक्त होत आहे. मे अखेरपर्यंत टँकरच्या मागणीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पावसाळा लांबला तर टंचाई निर्माण होऊ शकते. 2023 च्या सुरुवातीपासूनच दर महिन्याला अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही भागांत गारपीटही झाली आहे. एप्रिल महिन्यात पाच ते सहा वेळा झालेल्या अवकाळीने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मे महिन्याच्या सुरुवातीस तुरळक अवकाळी पावसाने हजेरी लावली. वातावरणात सतत होणार्‍या बदलामुळे शेतीपिकांवरही परिणाम होत असल्याचे दिसत आहे.

उन्हाळ्यात मुबलक पाणी
तालुक्यातील भोजापूर, ठाणगाव, कोनांबे, सरदवाडी या धरणांमध्ये अद्याप मुबलक पाणीसाठा असून, सिंचनासाठीही यंदा मुबलक पाणी उपलब्ध आहे. दोन वर्षांपासून झालेल्या समाधानकारक पावसाने भूजल पातळीत चांगलीच वाढ झाली असून, त्यामुळे शेतकर्‍यांच्या विहिरींनाही यंदा मुबलक पाणी असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे यंदा शेतकर्‍यांनी रोटेशनची मागणीही केलेली नाही.

हेही वाचा:

The post नाशिक : सिन्नर तालुका झाला टँकरमुक्त appeared first on पुढारी.