Site icon

नाशिक : सीएनजीच्या दरात सात महिन्यांत २५ रुपये वाढ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

काही महिन्यांपूर्वीच राज्यातील अनेक शहरांत सीएनजीच्या दरात कपात करण्यात आली होती, मात्र आता पुन्हा एकदा दरवाढ केल्याने वाहनधारकांची डोकेदुखी वाढली आहे. नव्या दरवाढीनुसार नाशिकमध्ये सीएनजी वाहनधारकांना प्रतिकिलोसाठी ९६ रुपये ५० पैसे मोजावे लागणार आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे हैराण झालेले वाहनधारक पर्याय म्हणून सीएनजीकडे बघत आहेत. मात्र सीएनजीचे दरही वाढू लागल्याने, वाहनधारक त्रस्त झाले आहेत. नाशिकमध्ये सीएनजीच्या दरात चार रुपयांनी वाढ केल्याने, दर प्रतिकिलो ९६.५० रुपये इतके झाले आहेत. घरगुती ग्राहकांना नैसर्गिक गॅसपुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने (एमएनजीएल) ही दरवाढ केली आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नाशिकमध्ये सीएनजीचे दर प्रतिकिलो ७१ रुपये इतके होते. त्यानंतर मे महिन्याच्या अखेरीस १० रुपयांनी तर जून महिन्यात चार रुपयांनी वाढ झाली होती. यानंतर आता पुन्हा चार रुपयांची वाढ झाली असून, सीएनजीचे भाव ९६ रुपये प्रतिकिलो पर्यंत पोहोचले आहेत. नैसर्गिक वायूच्या इनपूट खर्चात वाढ झाल्यामुळे सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ झाली आहे. घरगुती नैसर्गिक वायूच्या उपलब्धतेची कमतरता भरून काढण्यासाठी रि-गॅसिफाइड लिक्विफाइड नॅचरल गॅस मिसळणे आवश्यक आहे. यामुळे एमएनजीएलद्वारे खरेदी केल्या जाणाऱ्या गॅसच्या खर्चात वाढ झाली आहे. तरीही पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत अनुक्रमे ४४ टक्के आणि २० टक्के इतकी बचत होत आहे.

सीएनजीसाठी रांगाच रांगा :  पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे सीएनजीचा पर्याय उत्तम ठरत असतानाच सीएनजीची दरवाढ डोकेदुखी ठरू लागली आहे. विशेष बाब म्हणजे सीएनजीच्या दरांनी केव्हाच डिझेलला मागे टाकले असून, पेट्रोलदराच्या समीप सीएनजीचे दर गेल्याने, ही दरवाढ वाहनधारकांची आर्थिक समीकरण विस्कळीत करणारी ठरत आहे. दुसरीकडे शहरात सीएनजी वाहने वाढत असताना, पुरेशा प्रमाणात गॅसची उपलब्धता होत नाही. सीएनजी घेण्यासाठी भल्या सकाळपासून पंपावर वाहनांच्या रांगा लागतात. गॅस संपुष्टात आल्यावर रांगेतील वाहनधारकांना माघारी फिरावे लागत असल्याने ग्राहकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : सीएनजीच्या दरात सात महिन्यांत २५ रुपये वाढ appeared first on पुढारी.

Exit mobile version