नाशिक : सीएनजीने केले डिझेलला ओव्हरटेक : चार रुपयांची वाढ; पुन्हा पेट्रोल गाड्यांना पसंती

www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
इंधनाला पर्याय म्हणून सीएनजीकडे बघितले जात होते. मात्र, आता सीएनजीचे दर पेट्रोल-डिझेलपेक्षाही झपाट्याने वाढू लागल्याने, सीएनजी वाहनधारक चिंतेत सापडले आहे. पुन्हा एकदा सीएनजीच्या दरात चार रुपयांची वाढ झाल्याने, सीएनजीने डिझेलला ओव्हरटेक केले आहे. शहरात डिझेलचे दर 93 रुपये 27 पैसे आहेत. तर दरवाढीमुळे सीएनजीचे दर आता 95 रुपये 90 पैशांवर पोहोचले आहेत. आता पेट्रोलच्या दरापासून सीएनजीचे दर केवळ दहा पावले म्हणजेच दहा रुपयांनी स्वस्त आहे.

गेल्या काही दिवसांपासून सीएनजीचे दर सातत्याने वाढत आहेत. काही दिवसांपूर्वीच सीएनजीचे दर वाढले होते. आता पुन्हा एकदा त्यात चार रुपयांनी भर पडली आहे. दरवाढीअगोदर नाशिकमध्ये सीएनजीचे दर 91 रुपये 90 पैसे इतके होते. आता ते प्रतिकिलो 95 रुपये 90 पैशांवर पोहोचले आहेत. युरोपीय देशांकडून नैसर्गिक वायूला मोठ्या प्रमाणात मागणी वाढत असल्याने, भारतात पुरवठा सुरळीत ठेवणे अवघड होत आहे. ज्या गतीने दरवाढ होत आहे, त्यावरून लवकरच सीएनजीचे दर पेट्रोलच्या दरांना ओव्हरटेक करतील, अशीच काहीशी स्थिती आहे. सध्या नाशिकमध्ये पेट्रोल 106 रुपये 77 पैसे इतके आहे. सीएनजीच्या दरवाढीमुळे वाहनधारक त्रस्त आहेत. पेट्रोल-डिझेलला सर्वोत्तम पर्याय म्हणून सीएनजीकडे बघितले जाते. मात्र, आता सीएनजीचे दरच गगनाला भिडत असल्याने पुन्हा वाहनधारक पेट्रोल-डिझेलकडे वळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

सीएनजीला नकार
नवी कोरी चारचाकी घेताना शोरूमवाल्यांकडून सीएनजीचा पर्याय सुचविला जातो. एखाद्याने सीएनजी घेण्याचा विचार केल्यास, तब्बल 75 ते 80 हजार रुपयांनी कारची किंमत वाढते. मात्र, आता ज्या गतीने सीएनजीचे दर वाढत आहेत, त्यावरून ग्राहकांकडून सीएनजी कारला नकार देऊन पेट्रोल कार खरेदी करण्याला प्राधान्य दिले जात आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : सीएनजीने केले डिझेलला ओव्हरटेक : चार रुपयांची वाढ; पुन्हा पेट्रोल गाड्यांना पसंती appeared first on पुढारी.