नाशिक : सुज्ञास सांगणे न लागे…

ओझर www.pudhari.news

ओझर : मनोज कावळे
नाशिक जिल्हाभरात सात शाखा, 10 हजारांच्या आसपास सभासद आणि 100 कोटींहून अधिक ठेवी असा श्रीमंतीचा डामडौल असणार्‍या ओझर शहर व परिसराची मुख्य अर्थवाहिनी असलेल्या दि ओझर मर्चंट को-ऑप. बँकेची बिनविरोध होऊ पाहणारी निवडणूक काही अतिउत्साही संचालकांच्या अट्टहासापोटी आणि सत्तेच्या सारीपटामुळे सभासदांवर लादली गेल्याचे निवडणुकीचा निकाल बघता स्पष्ट होत आहे. त्यातही यंदा निवडणुकीत जातीचा विखारी प्रचार केला जात असल्याने सभासदांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

निवडणुकीच्या प्रारंभीच एक लाखाची ठेव आणि भागभांडवलामुळे बँकेत गेल्या दोन तपांपासून संचालकपद भूषविणार्‍या काही संचालकांचे अर्ज छाननीतच बाद झाल्याने त्यांचा हिरमोड झाला होता. यासाठी काही संचालकांनी उच्च न्यायालयात धावही घेतली होती. मुळातच बँकेचे उपविधी नियम सत्तारूढ संचालकांनीच तयार केले असताना तेच या उपविधी नियमाबाबत अनभिज्ञ होते. यावरूनच या संस्थेत दोन तपे संचालक म्हणून असणार्‍या या संचालकांच्या बुद्धीची आणि त्यांना असणार्‍या सहकाराविषयीच्या ज्ञानाची कल्पना यावी. संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील अनेक सहकारी बँकांमध्ये ठेव आणि भागभांडवल या एकाच मुद्द्यावर अनेकांचे अर्ज छाननीत बाद झाले. परंतु ओझर मर्चंट बँक वगळता कोणीही न्यायालयात गेले नाही. मग, ओझर मर्चंट बँकेच्या संचालक मंडळाचाच इतका अट्टाहास का, हे निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान झालेल्या आरोप-प्रत्यारोपांमुळे अनेक गोष्टी सभासदांच्या कानी पडल्या. आशीर्वाद पॅनलचे महेश गाडगे यांनी तर प्रचाराच्या सांगता सभेत पुराव्यासह आरोप केल्याने निवडणुकीचा इतका अट्टहास का, याची कल्पना येते. मुळातच सत्तारूढ गटात उभी फूट पडली. त्यातच प्रगती पॅनलचे बिनविरोध निवड झालेले शरद सिन्नरकर, डॉ. मेघा पाटील, ज्योती भट्टड हे तीन संचालक पुन्हा निवडणुकीस सामोरे गेले. याचे मुख्य कारण हे सत्तेची चावी होते. सत्तेच्या सारीपाटात बहुमत नसल्याने हे बिनविरोध निवडून आलेले संचालक पुन्हा निवडणुकीला सामोरे गेले. परंतु हे निवडून आल्यास पुन्हा रिक्त झालेल्या जागांवर निवडणूक होऊन बँकेला निवडणुकीच्या खर्चाचा भार सोसावा लागेल, या एकमेव भावनेतून सुज्ञ सभासदांनी बिनविरोध निवड झालेल्या संचालकांना धडा शिकवत पराभूत केले. ओझर मर्चंट बँकेवर बाह्यराजकारणात आमदार दिलीप बनकर यांच्याच गटाचे प्रभुत्व आजपर्यंत राहिलेले आहे. या निवडणुकीत आ. बनकर यांचेच दोन गट समोरासमोर उभे ठाकले असताना, बनकरांनी या निवडणुकीत रसच दाखवला नाही. त्यातच माजी आमदार अनिल कदम यांच्या गटाचे चार संचालक सत्तारूढ आशीर्वाद पॅनलकडून बिनविरोध निवडून आल्यानंतर शेवटच्या दोन दिवसांत माजी आमदार कदम यांनी केवळ पाठिंबा न देता मतदानाच्या दिवशी संपूर्ण दिवसभर मतदान केंद्रावर तळ ठोकल्याने आशीर्वाद पॅनलच्या चारही उमेदवारांचा विजय सुकर झाला. गेल्या तीन वर्षांपासून संस्थेच्या सभासदांना लाभांश दिलेला नाही, याची कोणतीही तमा न बाळगता निवडून आलेलेच संचालक पुन्हा निवडणुकीस सामोरे गेले, याचादेखील राग मतपेटीतून व्यक्त केला. नवीन निवडून आलेल्या संचालक मंडळावर बँक अ वर्गात आणून सभासदांना लाभांशवाटप करणे हे मोठे आव्हान असणार आहे. आर्थिक संस्थेचा सभासद हा तसा सुज्ञच असतो. परंतु, खरा सुज्ञ कोण उमेदवार की, सभासद याचे उत्तर निवडणूक निकालानंतर सभासदांनी देत सुज्ञास सांगणे न लागे, याचा प्रत्यय निवडणुकीत आला.

हेही वाचा:

The post नाशिक : सुज्ञास सांगणे न लागे... appeared first on पुढारी.