नाशिक (नांदूरशिंगोटे): पुढारी वृत्तसेवा
सिन्नर तालुक्यातील खंबाळे येथील लष्करी जवान जितेंद्र संपत आंधळे (२८) यांचे अपघाती निधन झाल्याने पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी ज्योती, सात वर्षीय मुलगा पियुष, तीन वर्षीय मुलगी आरोही असा परिवार आहे.
नाशिक पुणे महामार्गावर नांदूरशिंगोटे बायपास जवळ हा अपघात झाला आहे. समोरून येणाऱ्या वाहनाच्या प्रखर हेडलाइटच्या प्रकाशामुळे आंधळे यांचे डोळे दिपले. त्यानंतर दुचाकीचे नियंत्रण सुटून दुचाकी दुभाजकाला धडकली. यात जवान जितेंद्र आंधळे यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर पाठीमागे बसलेले ज्ञानेश्वर उत्तम सांगळे हे जखमी झाले आहे. जवान जितेंद्र आंधळे हे 23 मराठा बटालियन मध्ये केरळ येथे कार्यरत होते. त्यांची कर्नाटक येथे बदली झाल्याने पत्नी व मुलांना गावी ठेवून ते नवीन नियुक्ती झालेल्या ठिकाणी कर्तव्यावर हजर होणार होते. गुरुवार, दि. 23 रोजी रात्री ते पत्नी व मुलांना घेऊन मानोरी येथे सासरवाडीला गेले होते. त्यांना तिथे सोडून त्यांचे साडू ज्ञानेश्वर सांगळे यांच्यासोबत नातेवाईकांना भेटण्यासाठी नांदूरशिंगोटे येथे गेले होते. तेथून परतत असताना नांदुर-शिंगोटे बायपास जवळ हा अपघात झाला. अपघाताची माहिती समजतात वावी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे , उपनिरीक्षक आर. टी. तांदळकर यांसह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान आंधळे यांच्या अपघाती मृत्यूची बातमी लष्करी अधिकाऱ्यांना दिली असून शववि्छेदनानंतर दुपारी एक वाजे दरम्यान खंबाळे येथे शासकीय इतमामात आंधळे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
हेही वाचा:
- पुणे : दौंडमधील रस्त्यांसाठी 50 कोटी ; आमदार अॅड. राहुल कुल यांची माहिती
- Meta च्या कॅनडा ऑफिसमध्ये रुजू होताच ३ दिवसांतच नोकरीवरून काढले, भारतीय कर्मचाऱ्याची पोस्ट व्हायरल
- Nana Patole : पक्ष विरोधी भूमिका घेणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर काँग्रेस करणार कारवाई : नाना पटोले
The post नाशिक : सुट्टीवर आलेल्या जवानाचे अपघाती निधन appeared first on पुढारी.