नाशिक : सुरक्षारक्षकाच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा डाव फसला

चोरी,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
वकीलवाडी येथील एका संकुलातील मोबाइल दुकानाचे शटर फोडण्याचा प्रयत्न करणार्‍या चोरट्यांचा डाव तेथील सुरक्षारक्षकाच्या सतर्कतेमुळे फसल्याची घटना उघडकीस आली आहे. गुरुवारी (दि.15) मध्यरात्री 2 च्या सुमारास ही घटना घडली. मोबाइल दुकानाचे शटर उचकटून चोरी करण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला होता. सुरक्षारक्षकाने धाव घेताच चोरटे कारमधून पसार झाले. हा सर्व प्रकार तेथील सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

मोबाइल व अ‍ॅक्सेसरीज विक्रीसाठी वकीलवाडी, एमजी रोड परिसर प्रसिद्ध आहे. या ठिकाणी बहुतांश मोबाइल विक्री, दुरुस्तीची दुकाने आहेत. ग्राहकवर्ग अधिक असल्याने व्यावसायिकांनीही दुकानात महागडे मोबाइल, अ‍ॅक्सेसरीजचा माल भरलेला आहे. या आधीही शहरातील मोबाइल विक्रीची दुकाने फोडून चोरट्यांनी लाखो रुपयांचे मोबाइल चोरून नेले आहेत. त्यामुळे चोरट्यांच्या रडारवर ही दुकाने असल्याचाही संशय होता. मध्यरात्री 1.30 ते 1.45 च्या सुमारास एका कारमधून चौघे चोर वकीलवाडीत आले. त्यांनी संकुलाच्या प्रवेशद्वारावर कार उभी करून त्यातून तीन चोरटे खाली उतरले व त्यांनी मोबाइल दुकानाचे शटर उचकटण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या आवाजाने पहिल्या मजल्यावर असलेला सुरक्षारक्षक सतर्क झाला व आरडाओरड करीत पुढे आला. त्यामुळे चोरट्यांनी तेथून काढता पाय घेतला.

त्यापैकी एक चोरटा उलट दिशेला धावला, एक चोरटा कारमध्ये बसला व एक धावत्या कारमध्ये बसण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले. घटनेची माहिती कळताच सरकारवाडा पोलिसांचे पथक घटनास्थळी आले. दुकानमालकास माहिती मिळाल्यानंतर तेदेखील तेथे आले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

हेही वाचा :

The post नाशिक : सुरक्षारक्षकाच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा डाव फसला appeared first on पुढारी.