Site icon

नाशिक : सुरक्षिततेची जबाबदारी सांभाळणारेच असुरक्षित; पोलिस वसाहती समस्यांच्या विळख्यात

नाशिक : गौरव अहिरे
सर्वसामान्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी सांभाळणारे पोलिस अंमलदार त्यांच्या कुटुंबीयांसह असुरक्षित वसाहतीत राहत असल्याचे चित्र आहे. गळके छत, अस्वच्छ परिसर, जीर्ण घरे, इतर समस्यांनी पोलिस वसाहती ग्रासलेल्या आहेत. वर्षानुवर्षे राहत असलेल्या पोलिसांना या समस्या कायमस्वरूपी भेडसावत असून, त्याकडे अधिकार्‍यांचे दुर्लक्ष होत असल्याने वसाहतीतील समस्या सुटणार केव्हा हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे.

नाशिक : पोलीस वसाहतीत गळक्या छतावर लावलेला प्लास्टिकचा कागद.(छायाचित्रे : हेमंत घोरपडे)

शहरात गंगापूर रोड, सीबीएसजवळ, आडगाव, अंबड, देवळाली कॅम्प, पाथर्डी फाटा, नाशिकरोड परिसरात पोलिस वसाहती आहेत. या ठिकाणी सहाशेहून अधिक निवासस्थाने असून, त्यात सदनिका, कौलारू घरांचा समावेश आहे. मात्र, दुरुस्तीअभावी अनेक घरे राहण्यायोग्य नसल्याने ती रिकामीच असल्याचे चित्र आहे. तर ज्या घरांमध्ये पोलिस कुटुंब राहत आहेत ती घरेदेखील समस्येच्या गर्तेत अडकलेली दिसतात. अनेक वर्षांपासून देखभाल दुरुस्ती न झाल्याने घरांना गळती लागली असून, भिंतींना ओल लागल्याने अनेकदा रंगरंगोटी करावी लागते. तर पाण्याचीही समस्या काही ठिकाणी जाणवते. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याने या घरांची दुरुस्तीही रखडली असल्याचे बोलले जाते.

रस्त्यांची दुर्दशा अन् दुर्गंधीचे साम्राज्य
पोलिस वसाहतींमध्ये रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. त्याचप्रमाणे वसाहतींमधील काही घरांच्या भिंती खचल्या असून, भेगा पडल्या आहेत. घरांची छते गळकी बनली आहेत. कौलारू घरे असल्याने त्यावर प्लास्टिक टाकून तात्पुरता उपाय केला जातो. सांडपाणी, कचर्‍याची विल्हेवाट पूर्ण होत नसल्याने परिसरात अस्वच्छता, दुर्गंधी पसरली आहे. काही ठिकाणी उंदीर, घुशी, सापांचा वावर वाढल्याचेही दिसून येतेे.

…अशा आहेत समस्या
* कच्चा रस्ता खड्ड्यांमुळे वाहने चालवताना कसरत.
* पथदीप बंद असल्याने अंधाराचे साम्राज्य
* ड्रेनेज वारंवार तुंबत असल्याने दुर्गंधीचा त्रास
* काही घरांचे दरवाजे, खिडक्या तुटलेल्या अवस्थेत
* घरांची छते गळकी असल्याने टाकावे लागते प्लास्टिक
* अनेक घरांच्या भिंतीना तडे आणि ओल
* अभ्यासिका, व्यायामशाळेचा अभाव

The post नाशिक : सुरक्षिततेची जबाबदारी सांभाळणारेच असुरक्षित; पोलिस वसाहती समस्यांच्या विळख्यात appeared first on पुढारी.

Exit mobile version