नाशिक : ’सुरत-चेन्नई’साठी दिंडोरी तालुक्यात अधिग्रहण

सुरत चेन्नई मार्ग www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्रालयाने सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्गासाठी दिंडोरी तालुक्यातील 12 गावांमधील 174 हेक्टर क्षेत्राच्या अधिग्रहणाची अंतिम अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे संबंधित गावांमध्ये लवकरच जमीन भू-संपादनाची प्रक्रिया सुरू होणार आहे. पुढील पाच ते सहा महिन्यांत हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे.

केंद्र सरकारच्या भारतमाला योजनेंतर्गत 1 हजार 270 किलोमीटर लांबीचा सुरत-चेन्नई महामार्ग उभारण्यात येणार आहे. हा प्रकल्प 2026 पर्यंत पूर्ण करण्याचा सरकारचा मानस आहे. या महामार्गामुळे सुरत-नाशिक प्रवास अवघ्या अडीच तासांवर येणार आहे, तर नाशिक व सोलापूर या दोन जिल्ह्यांमधील अंतर 50 किलोमीटरने कमी होईल. नाशिक जिल्ह्यात महामार्गाची लांबी 122 किलोमीटरची असणार आहे. सुरगाणा, पेठ, दिंडोरी, निफाड, नाशिक व सिन्नर या तालुक्यांतील 980 हेक्टर क्षेत्राचे संपादन करण्यात येणार आहे. त्यानुसार केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्रालयाने दिंडोरी तालुक्यातील 12 गावांची अंतिम भू-संपादनाची अधिसूचना सोमवारी (दि. 21) प्रसिद्ध केली आहे.

  • नाशिक, नगर, सोलापूरमधून जाणार महामार्ग
  • नाशिक जिल्ह्यात 122 किलोमीटरचा मार्ग
  • महाराष्ट्रात सुरगाण्यात राक्षसभुवन येथे एन्ट्री पॉइंट
  • अक्कलकोट (सोलापूर) येथे राज्याचा एक्झिट पॉइंट
  • नाशिक-सुरत अंतर अवघे 176 किलोमीटरवर

भू-संपादनाच्या कार्यवाहीला प्रारंभ : दिंडोरी तालुक्यातील 12 गावांमधील 287 गटांमधील 174.2317 हेक्टर क्षेत्र संपादित केले जाणार आहे. जमीन संपादनावेळी बाधित शेतकर्‍यांना चालू रेडीरेकनरच्या चारपट मोबदला भरपाई म्हणून दिला जाईल. याशिवाय बाधित जमिनीतील पाइपलाइन, वृक्ष, विहिरी, घरे, जनावरांच्या गोठ्यासाठीची भरपाई शेतकर्‍यांना देण्यासंदर्भातील बाबींची पूर्तता प्रशासनाने पूर्ण केली आहे. त्यामुळे लवकरच भू-संपादनाच्या कार्यवाहीला प्रारंभ होणार आहे.

दिंडोरी तालुक्यातील महामार्गांतर्गत गावांमधील भू-संपादनाची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. गटनिहाय जमिनींचे तसेच जमिनीतील अन्य मालमत्तांचे मूल्यांकन तयार आहे. यापुढील टप्प्यात निवाडे करून जमीन संपादनाची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. – गणेश मिसाळ, प्रांताधिकारी (प्रभारी), दिंडोरी.

गावनिहाय गटसंख्या अशी…

आंबेगण 17
ढकांबे 37
थाऊर 27
इंदोरे 10
जांबुटके 03
पिंपळनारे 50
रामशेज 06
रासेगाव 43
नालेगाव 33
शिवनई 01
उमराळे बु, 30
वरवंडी 30
एकूण 287

हेही वाचा:

The post नाशिक : ’सुरत-चेन्नई’साठी दिंडोरी तालुक्यात अधिग्रहण appeared first on पुढारी.