Site icon

नाशिक- सुरत प्रवासाचा वेळ येणार सव्वा तासावर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

भारतमाला योजनेंतर्गत केंद्र सरकार सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्ग उभारणार आहे. नाशिक जिल्ह्यातील सहा तालुक्यांमधून हा १२२ किमीचा प्रकल्प जाणार आहे. नाेव्हेंबरअखेर प्रकल्पासाठीच्या भूसंपादनास प्रारंभ करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी दिली. दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जिल्ह्यातील दोन पॅकेजच्या निविदा प्रक्रियेसंदर्भातील प्रस्ताव दिल्लीला सादर केला आहे.

सुरत-चेन्नई हा १२७० किमी.चा सहापदरी मार्ग उभारण्यात येणार आहे. जिल्ह्यात सुरगाणा येथे महामार्गाचा एन्ट्री पाॅइंट आहे. पुढे पेठ, दिंडोरी, नाशिक, निफाड आणि सिन्नर या तालुक्यांमधून जाणार आहे. केंद्र सरकारचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असल्याने जिल्हा प्रशासनेही त्यादृष्टीने तयारी सुरू केली आहे. जिल्ह्यात तीन पॅकेजअंतर्गत महामार्गाचे कामकाज केले जाणार आहे. सुरगाणा व पेठ येथे वन जमिनीचा गुंता सुटलेला नाही. त्यामुळे उर्वरित दोन पॅकेजमधील कामासंदर्भातील निविदा प्रक्रियेबाबतच्या तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यासाठी स्थानिक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिल्लीस्थित मुख्यालयी प्रस्ताव सादर केला आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या कामाला गती मिळणार आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने प्रकल्पासाठी तयारी सुरू केली असताना जिल्हा प्रशासनानेही स्थानिक पातळीवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यानुसार प्रशासनाकडून सध्या जमीन भूसंपादनासाठीचे निवाडे – प्रक्रिया सुरू असून, ऑक्टोबरपर्यंत पूर्ण केली जाणार आहे. तर नोव्हेंबरपासून प्रत्यक्ष जमीन अधिग्रहणास सुरुवात होणार असून, जानेवारीअखेरपर्यंत शेवटच्या बाधिताला मोबदल्याचे वितरण करण्याचे लक्ष प्रशासनाने ठेवले आहे. दरम्यान, जून २०२३ पर्यंत जमिनीच्या महामार्गासाठी हस्तांतरण करण्यात येईल, असे उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) नीलेश श्रींगी यांनी सांगितले.

सुरत सव्वा तासावर

चेन्नई-सुरत ग्रीनफिल्ड महामार्ग हा राज्यातील नाशिक, नगर व सोलापूर जिल्ह्यातून जाणार आहे. सुरगाणा येथे एन्ट्री पाॅइंट तर अक्कलकोट (जि. सोलापूर) येथे एक्झिट पाॅइंट असेल. महामार्गामुळे नाशिक-सुरत या दोन शहरांमधील प्रवासाचा वेळ अवघ्या सव्वा तासावर येणार आहे. तर नाशिक ते सोलापूर हे अंतर ५० किलोमीटरने कमी होणार आहे. भविष्यात नाशिकमधून सुरत व दक्षिणेकडील राज्यात भाजीपाला व औद्योगीक मालाची निर्यात जलदगतीने होणार आहे.

हेही वाचा :

The post नाशिक- सुरत प्रवासाचा वेळ येणार सव्वा तासावर appeared first on पुढारी.

Exit mobile version