Site icon

नाशिक : सूर्यफुलांच्या शेतीतून साधली आयुष्य फुलवण्याची संधी, कौतिकपाडे येथील शेतकऱ्याचा प्रयोग

सटाणा (जि. नाशिक) : सुरेश बच्छाव

तालुक्यातील कौतिकपाडे येथील विलास राघो दात्रे या प्रयोगशील शेतकऱ्याने कांदा पिकाला पर्याय म्हणून सूर्यफुलाची लागवड केली आहे. खास बाब म्हणजे मजुरी, खते आणि फवारणीचा खर्च टळल्याने सूर्यफुलातून प्रति एकरी कांद्याच्या तुलनेत चांगले उत्पन्न मिळाले आहे. साहजिकच तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना हा प्रयोग अनुकरणीय ठरला असून अवकाळी पावसाचाही बिलकूलही फटका बसत नसल्याने शेतकऱ्यांसाठी तो आशेचा नवा किरण ठरू शकतो.

कौतिकपाडे येथील विलास दात्रे अन्य शेतकऱ्यांप्रमाणेच कांदा पिकाला पुरते वैतागले होते. भरमसाठ खर्च करून उत्पादन खर्चही निघत नसल्याने हवालदिल बनलेल्या दात्रे यांनी युट्युबवरून सूर्यफूल लागवड व उत्पादनाची माहिती घेतली. त्यानुसार प्रारंभी त्यांनी पावसाळ्यात एक एकरावर सूर्यफुलाची लागवड केली. ती यशस्वी ठरल्याने दात्रे यांनी उन्हाळ्यात तब्बल १५ एकरात लागवड केली. पहिल्या टप्प्यात डिसेंबरमध्ये तीन एकर तर उर्वरित जानेवारी व फेब्रुवारीमध्ये लागवड करण्यात आली.

त्यासाठी त्यांनी पाचोरा येथून ऍडव्हंटा कंपनीचे बियाणे खरेदी केले. १५ एकरसाठी एकूण २४ किलो बियाणे लागले. सरी पद्धतीने मक्याच्या धर्तीवर अर्धा पाऊण फुटाच्या अंतराने मजुरांच्या हाताने बियाणे टाकून लागवड केली. लागवडीवेळी १५:१५:१५ दाणेदार खाद्य टाकले. तेव्हापासून दर आठ दिवसांनी पाणी दिले. विशेष बाब म्हणजे पिकाची वाढ वेगाने होत असल्याने त्याच्याखाली तन उगत नाही. त्यामुळे निंदनीचा खर्च टळतो. साडेतीन महिन्यात येणाऱ्या पिकाला दरम्यान कुठल्याही रोगाची बाधा न झाल्याने फवारणीचा खर्चही टळला. एरवी सूर्यफुलावर केवढा नावाच्या व्हायरसचा प्रादुर्भाव होतो. परंतु दात्रे यांच्या शेतात मात्र कुठल्याही आजाराचा प्रादुर्भाव आढळला नाही. डिसेंबरमध्ये केलेल्या सूर्यफुलाची काढणी करण्यात आली.

अवकाळीचाही फटका नाही 

साधारणत: पाच ते सहा मजूर दिवसभरात दहा ट्रॉली फुले तोडू शकतात. त्यामुळे काढणीचा खर्चही कमी आला. काढणीनंतर किमान आठ ते दहा दिवस फुले उन्हात वाळवावी लागतात. त्यानंतर बाजरी काढण्याच्या मळणी यंत्राची चाळणी बदलून त्यावरच सूर्यफुलाची काढणी करण्यात आली. दात्रे यांना एकरी ७ ते ८ क्विंटल उत्पादन मिळाले. त्यास साडे ६ हजार रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला. कांद्याशी तुलना करता उत्पादन खर्च व मेहनत कमी असल्याने सूर्यफूल उत्पादन त्यांना नक्कीच फायदेशीर ठरले. सद्यस्थितीत तालुक्यातील शेतकऱ्यांसमोरील अवघड आव्हान ठरलेल्या अवकाळी पावसाचाही या उत्पादनावर तसूभरही फरक पडला नाही, हे विशेष!

त्यामुळे साहजिकच कांद्याची रडकथा रडण्यापेक्षा शेतकऱ्यांना सूर्यफूल पिकातून आयुष्य फुलविण्याची संधी दात्रे यांच्या प्रयोगातून मिळाली आहे, यात शंकाच नाही.

देशातील खाद्यतेलाची वाढती गरज पाहता तेलबियातील प्रमुख असलेल्या सूर्यफुलाला आगामी काळात मोठे भवितव्य आहे.  ४ हजार रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव खाली आले, तरीही हे पीक परवडू शकते.

विलास दात्रे, (उत्पादक) कौतिकपाडा

हेही वाचा :

The post नाशिक : सूर्यफुलांच्या शेतीतून साधली आयुष्य फुलवण्याची संधी, कौतिकपाडे येथील शेतकऱ्याचा प्रयोग appeared first on पुढारी.

Exit mobile version