नाशिक : सैन्यदलातील ‘अग्निवीर’चे प्रशिक्षण तोफखाना केंद्रात सुरू

अग्निवीर भरती

नाशिक (नाशिकरोड) : पुढारी वृत्तसेवा

भारत सरकारने सैन्यदलात सेवा बजावण्यास इच्छुक असलेल्या सुशिक्षित तरुणांसाठी अग्निपथ योजनेंतर्गत अग्निवीरांची भरती करण्याची घोषणा गत वर्षी जून महिन्यात केली होती. त्या अंतर्गत नाशिकरोड येथील तोफखाना केंद्रात देशाच्या कानाकोपर्‍यातून तरुण दाखल होत आहेत. आठवडाभरापूर्वी दाखल झालेल्या तरुणांचे प्रशिक्षण सुरू झाले आहे.

तोफखान्याचे कमान्डंट ब्रिगेडिअर ए. रागेश यांच्या नेतृत्वाखाली अग्निवीरांसाठी सुसज्ज यंत्रणा उभारण्यात आली आहे, अशी माहिती लेफ्टनंट कर्नल एस. के. पांडा यांनी शनिवारी (दि. 7) पत्रकार परिषदेत दिली. अग्निवीर योजनेंतर्गत युवकांना भारतीय सैन्यदलात चार वर्षांसाठी सेवा बजावण्याची संधी मिळणार आहे. सुशिक्षित बेरोजगार तरुणांना अग्निवीर म्हणून सैन्यात भरती केले जात आहे. तोफखाना केंद्रातून प्रशिक्षण घेणार्‍या अग्निवीरांना भारतीय सैन्यात तोफा चालविणारा गनर, तांत्रिक सहायक (टेक्निकल असिस्टंट), रेडिओ ऑपरेटर, मोटार ड्रायव्हर या चार महत्त्वाच्या पदांवर सेवा बजावण्याची संधी मिळणार आहे. यासाठी मूलभूत शास्त्रशुद्ध सैनिकी प्रशिक्षण हे केंद्रातील प्रशिक्षकांकडून दिले जात आहे. त्यामध्ये 10 आठवड्यांचे प्राथमिक सैनिकी प्रशिक्षण आणि 21 आठवड्यांचे अ‍ॅडव्हान्स सैनिकी प्रशिक्षणाचा समावेश आहे. प्रशिक्षण कालावधी एकूण 31 आठवड्यांचा राहणार असल्याचे पांडा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. तोफखाना केंद्रात जयभवानी रोडवरील अशोकचक्र प्रवेशद्वारातून आतमध्ये प्रवेश केल्यानंतर डाव्या हाताला स्वतंत्र प्रशस्त असे ‘अग्निवीर रिसेप्शन सेंटर’ उभारण्यात आले आहे. याठिकाणी स्वागतफलक तसेच बंदूकधारी सैनिकांच्या छायाचित्रांचे फलक लावण्यात आले आहेत. या केंद्रातून बायोमॅट्रिक तपासणी, मूळ कागदपत्रांची पडताळणी करण्यापर्यंत सर्व प्रक्रिया पार पाडली जाते. तोफखाना केंद्रात प्रवेश केल्यानंतर रिसेप्शन सेंटरमध्ये अग्निवीर तरुणांची कायदेशीर कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण केली जाते. त्यानंतर येथून पुढे त्यांना त्यांच्या निवास कक्षात जवान घेऊन जातात.

हेही वाचा:

The post नाशिक : सैन्यदलातील ‘अग्निवीर’चे प्रशिक्षण तोफखाना केंद्रात सुरू appeared first on पुढारी.