Site icon

नाशिक: सोमवारपासून थकबाकीदारांच्या घरासमोर वाजणार ‘ढोल’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
थकीत घरपट्टी वसुली करण्यासाठी महापालिकेच्या विविध कर आकारणी विभागाकडून येत्या सोमवारपासून (दि.17) थकबाकीदारांच्या घरासमोर ढोल वाजविण्यात येणार आहे. महापालिकेने 1,258 थकबाकीदारांची यादी संकेतस्थळावर जाहीर केली आहे. त्या पार्श्वभूमीवर मनपा प्रशासन आता करवसुलीकरता अ‍ॅक्शन मोडवर आले आहे. थकबाकी वसूल होत नाही तोपर्यंत ढोल वाजविण्यात येणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त तथा कर विभागाच्या उपआयुक्त अर्चना तांबे यांनी सांगितले.

मनपा आयुक्त चंद्रकांत डॉ. पुलकुंडवार यांनी घरपट्टी-पाणीपट्टी वसुलीचा आढावा घेतल्यानंतर थकबाकी वसुलीसाठी मोहीम राबविण्याचे आदेश त्यांनी कर आकारणी विभागाला दिले आहेत. त्यानुसार उपआयुक्त अर्चना तांबे यांनी सहाही विभागांतील बड्या थकबाकीदारांची यादी तयार करून यादी महापालिकेच्या संकेतस्थळावर जाहीर केली आहे. सहा विभागांत एक लाख लाखापेक्षा अधिक थकबाकी असलेले 1,258 थकबाकीदार आहेत. या बड्या थकबाकीदारांना अंतिम नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून थकबाकी भरली जात नसल्याने थकीत करवसुलीकरता थकबाकीदारांच्या घरांसमोर ढोल बडविण्यात येणार असल्याचे तांबे यांनी सांगितले. करवसुलीकरता सहाही विभागांत सहा ढोल पथकांची नियुक्ती करण्यात आली असून, संबंधितांना एक-दोन दिवसांत कार्यादेश दिले जाणार आहेत. प्रत्येक विभागासाठी एक ताशा व दोन ढोलवादक उपलब्ध करून दिले जाणार आहे. ढोलवादनाच्या कार्यक्रमाचे छायाचित्रण केले जाणार आहे.

एक लाखापेक्षा अधिक थकबाकी असलेल्या बड्या थकबाकीदारांची यादी तयार केली असून, नोटिसा देऊनही वसुली होत नसल्यामुळे येत्या सोमवार, दि.17 ऑक्टोबरपासून या थकबाकीदारांच्या घरासमोर ढोल वाजवून त्यांना थकबाकी भरण्यासाठी प्रवृत्त केले जाणार आहे. – अर्चना तांबे, उपआयुक्त, कर विभाग.

एक लाखापुढील थकबाकीदार असे….
विभाग                थकबाकीदार
नाशिक पूर्व         600
नाशिक पश्चिम     200
नाशिकरोड        153
सातपूर              142
सिडको              140
पंचवटी                23
एकूण                1,258

हेही वाचा:

The post नाशिक: सोमवारपासून थकबाकीदारांच्या घरासमोर वाजणार ‘ढोल’ appeared first on पुढारी.

Exit mobile version