नाशिक : सोलर कंपनीतील आंदोलकांवर दरोड्याचा गुन्हा

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

चाळीसगाव शहराजवळील बोढरे शिवारातील जेबीएम सोलर कंपनी आणि आवादा ग्रुप फर्मी सोलर कंपनीत आंदोलनाच्या बहाण्याने अनधिकृतपणे कंपनीची भिंत तोडून प्रवेश करीत दरोड्याच्या उद्देशाने सोलर प्लेटचे सुमारे एक कोटींचे नुकसान करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी ४५ जणांविरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. काही संशयीतांना ताब्यात घेण्यात आले आहे.

कंपनीचे सहाय्यक व्यवस्थापक कैलास विठ्ठलराव घुगे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, भीमराव बुधा जाधव (रा. बोढरे) व भरत पाडुरंग चव्हाण (रा. चाळीसगाव) यांनी चिथावणी देत आंदोलनाच्या बहाण्याने जमाव जमवला. जमावाने जेबीएम सोलर कंपनीची ब्लॉक नं. ०७ ची भिंत मोठा दगड ढकलुन तोडून दरोड्याच्या उद्देशाने हत्यारानिशी अनधिकृत प्रवेश करीत ब्लाँक नं. ७ व ५ मधील ९६ हजार रुपये किंमतीच्या आठ सोलर प्लेटा लांबवल्या तसेच चोरीस विरोध केल्यावर ४७० सोलर प्लेटांचे तोडफोड करुन एकूण ५६ लाख ४० हजारांचे नुकसान केले व त्याचप्रमाणे आवादा फर्मी सोलर कंपनीतील ब्लाँक नं. १६ मध्ये घुसून ब्लॉक नं. १६, ११, ८, ९, ६ मधील सहा लाख पाच हजार रुपये किंमतीच्या सात सोलर प्लेटा चोरुन नेल्यात तसेच ४०० सोलर प्लेटा फोडून ३८ लाखांचे नुकसान केले. एकूण ९६ लाख दोन हजार पाचशे रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी निंबा राठोड, पुंडलिक मदन राठोड, नवनाथ मदन राठोड, कडू महादू राठोड, सुनील सीताराम चव्हाण यांच्यासह ४५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यातील काही जणांना अटकही करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे हे करीत आहेत.

हेही वाचा:

The post नाशिक : सोलर कंपनीतील आंदोलकांवर दरोड्याचा गुन्हा appeared first on पुढारी.