
दिंडोरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
सह्याद्री फार्म्सच्या शेतकऱ्यांच्या शेतात टाटा ट्रस्टचा उपक्रम असलेल्या सस्टेन प्लसच्या माध्यमातून 90 सोलर पंप बसविल्यामुळे शेतकऱ्यांना विस्कळीत लोडशेडिंगच्या समस्येवर मात करणे शक्य झाले आहे. तसेच त्यांच्या पिकांवर होणारा परिणाम व त्यामुळे होणारे आर्थिक नुकसान टाळणे शक्य झाले आहे. शिवाय सोलर ड्रायरचा प्रायोगिक प्रकल्प हाती घेत 500 किलो क्षमतेचे 20 सोलर टनेल ड्रायर उभारले आहेत.
यासाठी सस्टेन प्लसकडून प्रतिड्रायर 65 टक्के आर्थिक सहाय्य व उर्वरित 35 टक्के आर्थिक भार शेतकऱ्यांनी उचलला. या माध्यमातून शेतकऱ्यांना 20 लाखांचे आर्थिक सहाय्य मिळाले. या सर्व ड्रायरची उभारणी इंदोरस्थित रहेजा सोलार या संस्थेने केली. सोलर ड्रायर उभारणीनंतर शेतकऱ्यांना सह्याद्री फार्म्स व रहेजा सोलरमार्फत उत्पादन प्रशिक्षण देण्यात आले. गेल्या वर्षभरात या शेतकऱ्यांनी द्राक्ष पिकातून बेदाणा निर्मिती, टोमॅटोपासून सुकलेले काप तसेच मागील मार्च महिन्यापासून कांद्यापासून सुकविलेल्या कांद्याची निर्मिती करीत आहेत. यामध्ये टोमॅटो व कांदा पिकांमध्ये घसरलेल्या भावाच्या परिस्थितीत सोलर ड्रायरच्या प्रयोगामुळे शेतकऱ्यांना उत्पन्नाचा वेगळा पर्याय उपलब्ध झाला आहे. या प्रयोगाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी आतापर्यंत सुमारे 5 टन बेदाणा, 2 टन टोमॅटो व 10 टन कांदा या उत्पादनांची यशस्वीरीत्या प्रक्रिया केली आहे. प्रक्रिया केलेल्या मालाची खरेदी रहेजा सोलर्समार्फत केली जात आहे. या प्रयोगाची प्रायोगिक तत्त्वावर झालेली उभारणी व त्याला मिळालेले यश पाहता नवीन शेतकरी या ड्रायर उभारणीसाठी आग्रही आहेत. यासाठी केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री अन्नप्रक्रिया योजनेंतर्गत तसेच सस्टेन प्लसमार्फत नवीन शेतकऱ्यांना सोलर ड्रायर उपलब्ध करून देण्यात येत आहे.
द्राक्ष काढणीनंतर उरलेल्या मण्यांना प्रक्रिया केल्यामुळे अधिकचा भाव मिळू शकला. पूर्वी आम्ही फक्त मणी व्यापाऱ्यांना विकायचो. परंतु आता सोलार ड्रायरमुळे चांगल्या दर्जाचा बेदाणा निर्मिती करून त्यातून मूल्यवर्धन झाले व त्यामुळे नेहमीपेक्षा चांगला दरही मिळाला. तसेच उत्पन्नाचा एक वेगळा मार्ग तयार झाला.
– महेंद्र सुरवाडे, खतवड, ता. दिंडोरी, जि. नाशिक
सस्टेन प्लसच्या सहकार्याने सोलर ड्रायर व सोलर पंप यांचा प्रायोगिक तत्त्वावरील प्रकल्प राबविला. यातून अपारंपरिक ऊर्जेचा वापर शेतीसाठी करताना सोलर पंप व सोलर ड्रायर शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले. यामध्ये मूल्यवर्धन करून काढणी पश्चात होणारे वेस्टेज यावर नियंत्रण आणता आले. यातून शेतमालाचे दर पडण्याच्या काळात पर्यायी व्यवस्था नक्कीच उभी राहू शकेल.
– विलास शिंदे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक
सह्याद्री फार्म्स, मोहाडी
हेही वाचा :
- नगर : 19 वर्षीय तरूणाच्या हत्येप्रकरणी ग्रामस्थांचं पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन
- पृथ्वी शॉ म्हणाला, मला एकटं राहायला आवडतं
- Seema Haider : सीमा हैदरवर अटकेची टांगती तलवार, युपी ‘एटीएस’कडून चौकशी सुरु
The post नाशिक : सोलर ड्रायरच्या माध्यमातून बेदाणा, टोमॅटो व कांदा पिकावर प्रक्रिया appeared first on पुढारी.