नाशिक : सोळा गाव पाणीपुरवठा योजनेतून शुद्ध पाण्याचा पुरवठा पूर्ववत सुरू

www.pudhari.news

लासलगाव : पुढारी वृत्तसेवा
नांदूरमध्यमेश्वर धरणातून विसर्गामुळे लासलगाव-विंचूरसह 16 गाव पाणीपुरवठा योजनेतून काही अंशी गढूळ पाणीपुरवठा सुरू होता. मात्र, आता पाण्यातील गाळाचे प्रमाण कमी झाल्याने पुन्हा शुद्ध पाण्याचा पुरवठा सुरू झालेला आहे. राजकीय हेतूने बातम्या देत नागरिकांची दिशाभूल करू नये, असे आवाहन 16 गाव पाणीपुरवठा योजनेचे अध्यक्ष सरपंच जयदत्त होळकर यांनी नेत्यांना केले आहे. होळकर यांनी प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे की, 16 गाव पाणीपुरवठा योजनेची जलवाहिनी जुनाट झाल्याने गळती रोखण्यासाठी तात्पुरती दुरुस्तीची कामे सुरू आहेत. योजना सुरळीत चालू ठेवण्यासाठी अविरत प्रयत्न सुरू आहेत. मात्र, काही ठिकाणी शेतात पीक असल्याने दुरुस्तीत अडचणी येत आहेत. शेतकर्‍यांचे सहकार्य घेऊन दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यात येऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येत आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

नांदूरमध्यमेश्वरमधून पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी धरणाचे एक गेट बंद करण्यात आले होते. त्यामुळे त्यातून सुरुवातीला गढूळ पाणी येत होते. गढूळ पाणी नागरिकांनी काही दिवस पिण्यासाठी वापरू नये, अशी दवंडीदेखील देण्यात आलेली होती. मात्र, आता गाळाचे प्रमाण कमी झाल्याने शुद्ध स्वरूपात पाणीपुरवठा करण्यात येत असल्याचे होळकर यांनी म्हटले आहे. पाणीपुरवठा योजनेचे पूर्ण नूतनीकरण तसेच विजेचा खर्च कमी करण्यासाठी सौरऊर्जा प्रकल्प निर्माण करण्यास माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून 20 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या योजनेची निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. मात्र, मंत्रिमंडळाचा विस्तार रखडल्याने हे काम अद्याप सुरू होऊ शकलेले नाही. या योजनेचे काम पुढील महिनाभरात सुरू होईल, असा विश्वास होळकर यांनी व्यक्त केला.

अधिकार्‍यांसमवेत पाहणी
16 गाव पाणीपुरवठा योजनेचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठी जलवाहिनी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या कामाची अधिकार्‍यांसमवेत पाहणी करण्यात आली. यावेळी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता पुरुषोत्तम भांडेकर, 16 गाव पाणीपुरवठा योजनेचे अध्यक्ष सरपंच जयदत्त होळकर, जिल्हा परिषद पाणी गुणवत्तातज्ज्ञ जयश्री बैरागी, गटविकास अधिकारी संदीप कराड, विस्तार अधिकारी सुधाकर सोनवणे, निफाड ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे मिस्त्री, शाखा अभियंता बिन्नर, ग्रामविकास अधिकारी शरद पाटील, जी. टी. खैरनार उपस्थित होते.

हेही वाचा:

The post नाशिक : सोळा गाव पाणीपुरवठा योजनेतून शुद्ध पाण्याचा पुरवठा पूर्ववत सुरू appeared first on पुढारी.