नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्हा परिषदेच्या स्टेडियम कॉम्प्लेक्समधील इमारतींच्या तळघरांमध्ये आधीच पडून असलेला कचरा आणि आता साचलेले पावसाचे पाणी यामुळे महात्मा गांधी मार्ग परिसर दुर्गंधीचा सामना करीत आहे. तसेच या साचलेल्या पाण्यावर वाढणार्या जीवजंतू, डास यांच्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे. मात्र, याबाबत जिल्हा परिषद वा नाशिक महापालिका यांच्यापैकी कोणीही पुढाकार घेत नसल्याने नागरिक हवालदिल आहेत.
नाशिक जिल्हा परिषदेची महात्मा गांधी मार्ग परिसरात मोठी जागा आहे. या ठिकाणी जिल्हा परिषदेची शासकीय कन्या शाळा, छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम आहे. तसेच या स्टेडियमच्या बाजूला महात्मा गांधी मार्गावर जिल्हा परिषदेने कॉम्प्लेक्स उभारले असून, त्यातील गाळे कराराने दिले आहेत. हे करार नव्याने करून भाडेपट्टा वाढवण्यात यावा, पोटभाडेकरू असल्यास त्यांना हटवावे आदी मागण्या जिल्हा परिषद सदस्यांकडून वारंवार करण्यात आल्या आहेत. मात्र, जिल्हा परिषदेच्या स्टेडियम समितीने याबाबत अद्यापपर्यंत काहीही कार्यवाही केलेली नाही. जिल्हा परिषद कॉम्प्लेक्सकडून जिल्हा परिषदेला काहीही उत्पन्न मिळत नसल्याने जिल्हा परिषदेच्या सेसनिधीतून तेथे काहीही कामे करण्याबाबत जिल्हा परिषद उत्सुक नाही. त्याचवेळी जिल्हा परिषदेकडून भाडेपट्ट्याने गाळे घेतलेल्या दुकानदारांनी या दुकानांमध्ये पोटभाडेकरू ठेवले आहेत. जिल्हा परिषदेसोबत झालेल्या करारानुसार या गाळेधारकांना पोटभाडेकरू ठेवता येत नाही. यामुळे याविरोधात भूमिका घेण्याबाबत जिल्हा परिषदेत वारंवार चर्चा होत असते. या पार्श्वभूमिवर जिल्हा परिषदेकडून स्टेडियम कॉम्प्लेक्समध्ये सुविधा पुरवण्याबाबत उदासीनता आहे.
त्याचप्रमाणे हे पोटभाडेकरूही या गाळ्यांशी आपला काही संबंध नसल्याप्रमाणे वागत आहेत. यामुळे या इमारतींच्या तळमजल्यामध्ये कचरा टाकणे, तळमजल्यांची स्वच्छता न ठेवणे याबाबी सर्रास घडत आहे.
जिल्हा परिषदेकडून प्रतिसाद नाही
याबाबत जिल्हा परिषदेच्या संबंधित अधिकार्यांशी संपर्क साधून त्यांच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याकडून काहीही प्रतिसाद मिळाला नाही.
तिढा सुटणार कसा?
या वर्षी सलगपणे जवळपास महिनाभर चाललेल्या संततधारेमुळे महात्मा गांधी मार्गावरील या इमारतींच्या तळमजल्यात पाणी साचले आहे. आधीचा कचरा व त्यात साचलेले पाणी यामुळे तेथे प्रचंड दुर्गंधी निर्माण झाली असून, या सडलेल्या कचर्यावर अनेक जीवजंतू व मच्छर तयार झाले आहेत. यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या इमारतींच्या तळमजल्याची स्वच्छता करणे हे या इमारतींमधील गाळेधारकांचे कर्तव्य असूनही ते याकडे दुर्लक्ष करीत आहेत. यामुळे हा तिढा सुटणार कसा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
हेही वाचा :
- पिंपरी : प्राप्त हरकतीवर आजपासून सुनावणी पीएमआरडीएकडून कार्यक्रम जाहीर
- Ranveer Singh nude photoshoot : रणवीर सिंहच्या न्यूड फोटोवर कपडे केले दान, व्हिडिओ व्हायरल
- Balwinder Safri : पंजाबी भांगड़ा स्टार गायक बलविंदर सफरी यांचे निधन, कोम्यातून बाहेर आले अन्
The post नाशिक : स्टेडियम कॉम्प्लेक्समध्ये कचरा सडला, नागरिकांचे आरोग्य धोक्यात appeared first on पुढारी.