नाशिक : स्मार्ट रोडवरील सायकल ट्रॅक झाला दिसेनासा; दुभाजकांचीही नासधूस

दुभाजक www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
कोट्यवधी रुपये खर्चुन तयार केलेला स्मार्ट रोड बेशिस्त वाहनचालकांमुळे स्मार्ट दिसत नाही. वाहतूक पोलिसांनीही दुर्लक्ष केल्याने स्मार्ट रोडवरील सायकल ट्रॅकवर सरसकट चारचाकी वाहनांचे वाहनतळ झाले असून, त्यामुळे सायकल ट्रॅकचे दुभाजकही तुटत आहेत. त्यामुळे याकडे लक्ष न दिल्यास वाहनांमुळे संपूर्ण सायकल ट्रॅकच दिसेनासा होण्याची शक्यता वाढली आहे.

स्मार्ट सिटी अंतर्गत अशोकस्तंभ ते त्र्यंबकनाका सिग्नलतर्फे दुतर्फा स्मार्ट रोड उभारण्यात आला. शहराच्या मध्यवर्ती भागातील या मार्गावर जिल्हा न्यायालय, जिल्हाधिकारी कार्यालय, सीबीएस या महत्त्वाच्या शासकीय आस्थापनांसह शाळा, व्यावसायिक संकुले आहेत. त्याचप्रमाणे या मार्गावरून शहरातील इतर मार्गांवर जाणे सोयीस्कर असते. त्यामुळे हा स्मार्ट रस्ता महत्त्वाचा मानला जातो. त्यानुसार येथे सिमेंटच्या रस्त्यासह प्रशस्त फुटपाथ, सायकल ट्रॅक, सीसीटीव्ही, आकर्षक पथदीप उभारले आहेत. या मार्गावरून ये-जा करणार्‍यांना सुखद अनुभव मिळत होता. मात्र, नव्याची नवलाई संपताच येथेही बेशिस्तपणा दिसत असून, त्याकडे वाहतूक पोलिसांचाही कानाडोळा चर्चेचा विषय बनला आहे. सायकल ट्रॅकवर सर्रास चारचाकी वाहने उभी करून वाहनधारक त्यांच्या कामानिमित्त तासनतास शासकीय कार्यालयांमध्ये जात आहेत. त्यामुळे हा स्मार्ट रोड की, वाहनतळ असा सवाल उपस्थित केला जात आहे. शहर पोलिसांच्या वतीने शहरात टोइंग कारवाई केली जाते, मात्र या मार्गावर टोइंग कारवाई होत नसल्याने वाहनधारक हक्काचे वाहनतळ समजून सायकल ट्रॅकवरच वाहने उभी करताना दिसत आहेत. वाहने उभी करताना व तेथून बाहेर निघताना अनेकदा चालक सायकल ट्रॅकच्या दुभाजकावरून वाहने नेत असल्याने अनेक दुभाजक तुटले आहेत, तर काही ठिकाणच्या दुभाजकांची अज्ञात व्यक्तींनी विल्हेवाट लावल्याचे दिसते. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा हा रस्ता वाहनतळामुळे बकाल होताना दिसत आहे.

सायकल ट्रॅकवर पार्किंग
स्मार्ट रोडवरून दररोज हजारो वाहने जात असतात. त्यापैकी शेकडो वाहने सायकल ट्रॅकवर उभी राहतात. त्यामुळे अनेकदा वाहतूक कोंडीचीही समस्या निर्माण होते. बेशिस्त चालकांवर दंडात्मक व टोइंग कारवाई सर्वत्र होत असताना या मार्गावर अपेक्षित कारवाई होत नसल्याने चालकांमध्ये धाकच नसल्याचे दिसते. पोलिसांकडून ई-चलन, टोइंग कारवाई होत नसल्याने तो चर्चेचा विषय आहे.

The post नाशिक : स्मार्ट रोडवरील सायकल ट्रॅक झाला दिसेनासा; दुभाजकांचीही नासधूस appeared first on पुढारी.