नाशिक : स्मार्ट स्कूलचा डिसेंबरपासून श्रीगणेशा

school,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महापालिकेच्या 112 शाळांपैकी 69 शाळा स्मार्ट होणार असून, त्यासाठी स्मार्ट सिटी कंपनीने 70 कोटी 30 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. नोव्हेंबरअखेरीस संबंधित मक्तेदारास कार्यारंभ आदेश देण्यात येऊन डिसेंबरपासून कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीत मनपातर्फे देण्यात आली.

पालकमंत्री दादा भुसे यांनी शुक्रवारी (दि.11) पंचक भागातील मनपा शाळा क्रमांक 49 मध्ये बैठक घेतली. स्मार्ट सिटीतर्फे प्रस्तावित स्मार्ट स्कूल प्रकल्पाचा आढावा त्यांनी घेतला. मनपा आयुक्त डॉ. चंद्रकात पुलकुंडवार यांनी स्वागत केले. बैठकीअगोदर ना. भुसे यांनी दुसरी ’क’ च्या वर्गात जाऊन मुलांशी संवाद साधला. त्यांची अक्षर ओळख क्षमता तपासली. बैठकीला मनपाच्या प्रभारी अतिरिक्त आयुक्त अर्चना तांबे, शहर अभियंता शिवकुमार वंजारी, स्मार्ट सिटीचे सीईओ सुमंत मोरे आदी उपस्थित होते.

पालकमंत्र्यांनी टोचले कान
मनपा शाळा स्मार्ट करण्याबरोबर तेथील स्वच्छतागृहे, कंपाउंड, खेळ सामग्री, डिजिटल साहित्य या मुद्द्यांकडेही लक्ष देण्याची गरज असल्याकडे पालकमंर्त्यांनी लक्ष वेधत एक प्रकारे मनपा अधिकार्‍यांचे कान टोचले. मनपा शाळेच्या 74 इमारतींपैकी पाच इमारतींची स्थिती योग्य नाही. त्या इमारतींचीही त्वरित दुरुस्ती किंवा नवीन बांधकाम करण्याचे नियोजन करावे त्यासाठी सीएसआर फंडाची मदत घेण्याची सूचना त्यांनी केली.

सध्या मनपा शाळेतील विद्यार्थी संख्या 29 हजार आहे. या आधी हीच संख्या 40 हजार होती. पुढील वर्षी 50 हजार विद्यार्थ्यांचे उद्दिष्ट देण्यात आले. यामुळे मनपाला येत्या शैक्षणिक वर्षात पूर्तता करावी लागणार आहे.

अशी असणार स्मार्ट स्कूल
मनपाच्या एकूण 69 शाळा स्मार्ट स्कूल होणार आहेत. एकूण 656 स्मार्ट क्लास, 69 संगणक प्रयोगशाळा, 69 मुख्याध्यापक कक्ष असणार आहेत. त्यासाठी स्मार्ट सिटी अंतर्गंत 70 कोटी 30 लाखांचा निधी उपलब्ध झाला आहे. संचालक मंडळाच्या बैठकीत प्रकल्पाला मंजुरी मिळाली असून, नोव्हेंबरअखेरीस कार्यारंभ आदेश मिळून डिसेंबरपासून कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी दिली. शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी सुनीता धनगर यांनी प्रकल्प आणि मनपा शाळांबाबत माहिती दिली. मनपाच्या एकूण 74 इमारती असून, त्यातील 69 सुरक्षित इमारतींमध्ये स्मार्ट स्कूल होणार आहेत.

स्मार्ट स्कूलसाठी असे झाले सर्वेक्षण
क्षमताधिष्ठीत आणि अत्याधुनिक अध्यापनशास्त्र, माहिती तंत्रज्ञान प्रणाली, डिजिटल आणि मल्टिमीडिया सामग्री, सर्वांगीण विद्यार्थी विकास, भौतिक सुविधा या सर्व घटकांचा विचार स्मार्ट स्कूल करताना केला आहे. 457 भिन्न मापदंड वापरून सर्वेक्षण अहवाल करण्यात आला आहे. त्यात सिव्हिल इन्फ—ास्ट्रक्चर, आयटी इन्फ—ास्ट्रक्चर, वॉश सुविधा, शिक्षकांची क्षमता वाढ, जीवन कौशल्य प्रशिक्षणाचा समावेश आहे. शिक्षकांना प्रशिक्षणदेखील दिले जाणार आहे. मे. पॅलेडियम कन्सल्टिंग इंडिया लि. या कंपनीची स्मार्ट स्कूल अंमलबजावणीसाठी सल्लागार म्हणून नेमणूक केली आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : स्मार्ट स्कूलचा डिसेंबरपासून श्रीगणेशा appeared first on पुढारी.