नाशिक : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने ऊसतोड बंद आंदोलन

स्वाभिमानी

दिंडोरी; पुढारी वृत्तसेवा : एक रक्कमी एफआरपी आणि इतर मागण्यांसाठी शेतकऱ्यांची एकजूट दाखवणे गरजेचे आहे. म्हणून १७ आणि १८ नोव्हेंबरला संपूर्ण राज्यामध्ये स्वाभिमानीच्या नेतृत्वामध्ये ऊसतोड बंद आंदोलन पुकारण्यात आले होते. गुरूवारी (दि.१७) नाशिक जिल्ह्यात या आंदोलनाला शेतकरी आणि कारखानदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कादवा सहकारी साखर कारखान्याच्या गेटवर स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांच्या नेतृत्वात ऊस बंद आंदोलन करण्यात आले.

नाशिक जिल्ह्यातील कादवा व वसाका या साखर कारखान्यांनी या आंदोलनाला अधिकृत पाठिंबा देऊन दोन दिवस ऊस तोडणी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला व आंदोलनाला सक्रिय पाठिंबा दिला. इतर साखर कारखान्यांनी अधिकृत पाठिंबा दिला नसला तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ऊस तोडी न घेतल्यामुळे आज नाशिक जिल्ह्यातील सर्व साखर कारखाने ठप्प झाले.

कादवा करखान्यावरील आंदोलनात स्वाभिमानी प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी शेतकऱ्यांना उसाच्या मिळणाऱ्या पैशाचे तुकडे करण्याचा घाट केंद्र आणि राज्य सरकार यांनी संगनमताने घातला आहे. पेट्रोल आम्हाला 110 रुपयाने इथेनॉल मिक्स करून विकतात आणि आमच्याकडून इथेनॉल सरासरी 60 रुपयांनी खरेदी करतात हा कुठला न्याय..? साखर ही अन्नधान्यासारखी जीवनाश्यक वस्तू नाही म्हणून तिची निर्यात खुली करणे गरजेची आहे. परंतु सत्ताधारी आणि विरोधक हे एकमेकांवर राजकीय चिखल फेक करण्यातच गुंग आहेत. त्यांना सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यात रस नाही अशी केंद्र आणि राज्य सरकारवर शेलक्या शब्दात टिका केली.

यावेळी सहकार नेते सुरेश डोखळे, स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष निवृत्ती गारे पाटील, राजू शिरसाठ , परशराम शिंदे, गंगाधर निखाडे, सचिन बर्डे , नरेंद्र जाधव , कुबेर जाधव यांनी मनोगते व्यक्त केली. या आंदोलनात सुरवातीपासून कादवा चे अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी स्वतः सहभाग घेतला. गेटवर येऊन निवेदन स्वीकारले तसेच कारखाना बंद ठेवून पाठिंब्याचे पत्र दिले. तसेच जास्तीत जास्त पहिली उचल शेतकऱ्यांना देण्याचे आश्वासन दिले.

तर या आंदोलनाला दत्तात्रये कावळे, सुनील मातेरे, प्रशांत कड,आत्माराम पगार, संजय पाटोळे, ललित जाधव, रामकृष्ण जाधव, गजानन घोटेकर, सचिन खालकर, संदीप वडजे, रवींद्र शेवाळे, वैभव जगताप, नामदेवराव चिने, निवृत्ती मातेरे, भाऊसाहेब मातेरे, बाळासाहेब जगताप, संदीप उफाडे, नारायण संधान, प्रभाकर मोरे, शंकर फुगट, संदीप वडजे, परशराम संधान, पांडुरंग गणोरे, वाळू फुगट, शाम जगताप, विश्वास संधान, बाजीराव धुमने यांच्यासह अनेक संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

अधिक वाचा :

The post नाशिक : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने ऊसतोड बंद आंदोलन appeared first on पुढारी.