नाशिक : हद्दपार गुन्हेगाराचा दोघांनी काढला काटा, मालेगावच्या गोल्डननगरमध्येे मध्यरात्री खून

मालेगाव खून

मालेगाव : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा
गोल्डननगरमध्ये मंगळवारी (दि. 6) मध्यरात्री थरारनाट्य घडले. सराईत गुन्हेगारावर दोघांनी धारदार हत्यारांनी हल्ला करत त्याचा निर्घृण खून केला. मनमाडमार्गे रेल्वेने पसार होण्याच्या प्रयत्नातील दोघा संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे.

शकील हॉटेलजवळ रात्री साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. सलमान अहमद सलीम अहमद (28, रा. बाग-ए-महेमूद जलकुंभाजवळ, संगमेश्वर शिवार) याच्यावर मागील भांडणाच्या कुरापतीतून दोघांनी धारदार हत्याराने वार केले. त्यात गंभीर जखमी होऊन सलमानचा जागीच मृत्यू झाला. संशयित तौसिफ अहमद रफिक अहमद उर्फ राजू व अकिल अहमद मो. सुगराती उर्फ पापा (दोघे रा. गोल्डननगर) यांनी दुचाकीने पळ काढला. मनमाड रेल्वे स्थानक गाठत तेथून फरार होण्याच्या प्रयत्न असलेल्या संशयितांचा पोलिसांनी वेगात केलेल्या शोधकार्यामुळे फसला. या प्रकरणी दोघांविरोधात पवारवाडी पोलिस ठाण्यात भादंवि कलम 302 सह विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

मंगळवारी (दि. 6) संशयितांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, मृत सलमान हा यापूर्वी अख्तराबादमध्ये वास्तव्याला होता. त्याच्यावर 324, 457, 380, 392, 323 आदी कलमान्वये गंभीर गुन्हे दाखल होते. त्याच्या समाजविघातक कृत्यांमुळे पोलिसांनी दाखल केलेल्या प्रस्तावावर उपविभागीय महसूल अधिकारी यांनी 28 नोव्हेंबर 2020 पासून दोन वर्षांसाठी नाशिक, धुळे, जळगाव या जिल्ह्यांतून हद्दपार केले होते. हद्दपारी संपण्यापूर्वीच तो मालेगावात वावरत होता. परंतु, त्याचा सुगावा पोलिसांना लागला नाही, हे विशेष. मात्र, गुन्हेगारांनीच त्याचा काटा काढला.

हेही वाचा :

The post नाशिक : हद्दपार गुन्हेगाराचा दोघांनी काढला काटा, मालेगावच्या गोल्डननगरमध्येे मध्यरात्री खून appeared first on पुढारी.