
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गेल्या आठवड्यात मालेगाव तालुक्यातील चिखलओहोळ आरोग्य केंद्रात उपचाराअभावी नवजात अर्भकाचा मृत्यू झाल्याप्रकरणी येथील वैद्यकीय अधिकारी व दोन आरोग्य सेविकांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नेहेते यांनी तपासणी करत अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल यांच्याकडे दिला होता. त्याअंतर्गत आरोग्य विभागाने त्यांना नोटीस बजावत आपले म्हणणे मांडण्यास सांगितले आहे.
चिखलओहळ गावात शेतमजुरीसाठी आलेल्या सोनाली दिलीप शिंदे (वय ३५ रा. परभणी) या प्रसूतीसाठी आरोग्य केंद्रात दाखल झाल्या. ६ डिसेंबर रोजी त्यांची प्रसूती सुखरूप पार पडली. दुपारी बाळाची तब्येत अचानक खालावल्यानंतर त्याच्यावर उपचार करण्यासाठी आरोग्य केंद्रावर डॉक्टर्स, नर्स किंवा आरोग्य सहायक कर्मचारी यापैकी कोणीही उपस्थित नव्हते. तब्बल एक तास बालकाला त्रास होत असतांना त्याच्यावर वेळीच उपचार न झाल्याने ते दगावले.
या घटनेमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल नेहते यांनी आरोग्य केंद्रास भेट देवून त्याची पाहणी केली होती. त्यांनी केलेल्या चौकशीच्या आधारे आरोग्य विभागाने आता कारवाईस प्रारंभ केला आहे.
हेही वाचा :
- Jalgaon : पारोळा तालुक्यात ९ पैकी ७ ग्रामपंचायतींवर फडकला शिंदे गटाचा भगवा
- Pune Gram Panchayat Live : बारामतीत प्रस्थापितांना मतदारांचा दे धक्का
The post नाशिक : हलगर्जीपणामुळे बाळाचा मृत्यू, वैद्यकीय अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई appeared first on पुढारी.