नाशिक : हवामान खात्याने मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने यंत्रणा अलर्ट मोडवर

Rain update:

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मंगळवार (दि. 6)पासून पुढील सहा दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत. जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी या काळातील संभाव्य आपत्तीला तोंड देण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनातील साधनसामग्री तयार ठेवत त्याची नियमित चाचणी घेण्याचे आदेश दिले आहेत. तसेच आवश्यक तेथे मॉकड्रिल घेण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (दि. 4) गंगाथरन डी. यांच्या अध्यक्षतेखाली महसूल विभागाची आढावा बैठक पार पडली. हवामान खात्याच्या अंदाजानुसार चालू महिन्यामध्ये जिल्ह्यात चांगल्या पावसाची शक्यता आहे. त्यातही 6 ते 12 जुलै या काळात जिल्ह्यात त्यातही विशेषत: घाटमाथा परिसरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर बैठकीत जिल्हाधिकार्‍यांनी तयारीबाबतचा आढावा घेतला. पावसाने आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास ती वेळीच आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करावे. तसेच जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी सतर्क राहावे, असे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले. आपत्कालीन परिस्थितीत वापरावयाची साधनसामग्री तालुक्यांच्या ठिकाणी उपलब्ध आहे. ज्यामध्ये पूरस्थितीत वापरावयाच्या बोटी, लाइट्स व तत्सम अनेक साधनांचा समावेश आहे. या साधनसामग्रीची तपासणी करताना पथकांनी तालुकानिहाय दिलेल्या भेटींबाबतचा अहवाल बैठकीत सादर करण्यात आला. बैठकीला सर्व उपजिल्हाधिकारी व तहसीलदार उपस्थित होते.

नाशिकमध्ये रिपरिप
नाशिक शहर व परिसरात सोमवारी (दि. 4) दिवसभर रिपरिप सुरू होती. त्यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी या पावसाने चाकरमान्यांची काहीशी कोंडी केली. स्मार्ट सिटीअंतर्गत सुरू असलेल्या कामांमुळे अनेक ठिकाणी तयार झालेल्या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहनचालकांची भंबेरी उडाली. शहरात सायंकाळी साडेपाचपर्यंत 4.2 मिमी पर्जन्य नोंदविण्यात आले. दरम्यान, ग्रामीण भागातही अनेक तालुक्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसल्या.

हेही वाचा :

The post नाशिक : हवामान खात्याने मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने यंत्रणा अलर्ट मोडवर appeared first on पुढारी.