नाशिक : हिवताप विभागातील तिघे लाच घेताना जाळ्यात

लाच लुचपतच्या जाळ्यात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

वैद्यकीय रजेवरून हजर झाल्यानंतर तक्रारदाराचा पगार काढून देण्याच्या मोबदल्यात १० हजार रुपयांची लाच घेणाऱ्या जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांसह दोन आरोग्यसेवक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले आहेत. जिल्हा हिवताप विभागात बुधवारी (दि. १७) हा सापळा रचण्यात आला.

वैशाली दगडू पाटील (रा. स्टेटस रेसिडेन्सी, गंगापूर) या जिल्हा हिवताप अधिका-यासह संजय रामू राव (४६, रा. पाथर्डी फाटा) व कैलास गंगाधर शिंदे (४७, रा. पांडवनगरी) अशी पकडलेल्या तीन संशयित लाचखोरांची नावे आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे  तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनुसार तो आजारपणामुळे रजेवर होता. त्यानंतर तो कामावर हजर झाला असता त्याचा पगार काढण्यासाठी त्याने अर्ज केला होता. त्यावेळी वैशाली यांनी तक्रारदाराकडे १० हजार रुपयांची लाच मागितली. तर लाचेची रक्कम घेण्यास दोन आरोग्यसेवकांना प्रवृत्त करून शिंदे यांनी लाच घेतली. लाचेची रक्कम घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडल्यानंतर तिघांनाही ताब्यात घेतले. तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक साधना इंगळे व त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

हेही वाचा :

The post नाशिक : हिवताप विभागातील तिघे लाच घेताना जाळ्यात appeared first on पुढारी.