Site icon

नाशिक : हॉटेल, दुकाने सुरु राहण्याबाबत होणार कारवाई; पोलिस आयुक्तालयाकडून रात्री दहाच्या वेळेत बदल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरात या आधी खाद्यपदार्थ, मद्यविक्री करणार्‍या आस्थापनांसह हॉटेल रात्री 10 वाजता बंद होत होते. मात्र, पोलिस आयुक्तालयाने खाद्यपदार्थ व मद्य पुरवणार्‍या आस्थापनांच्या वेळेसंदर्भात कार्यालयीन आदेश काढला असून, त्यात मध्यरात्री 1.30 पर्यंत बार, खाद्यपदार्थ व मद्यविक्री करणार्‍या आस्थापना रात्री 11.30 पर्यंत, तर हॉटेल मध्यरात्री 12.30 पर्यंत सुरू ठेवता येत आहे. यासंदर्भात शहरातील पोलिस ठाण्यांना आदेश दिले आहेत.

शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांकडून रात्री 10 वाजता मेडिकल व आरोग्यसेवेतील आस्थापना वगळता सर्व आस्थापना बंद केल्या जातात. पोलिस ठाणेनिहाय नेमलेले गस्ती पथक रात्री याची शहानिशा करत असतात. ज्या आस्थापना 10 नंतर सुरू असतात, त्यांच्यावर पोलिसांनी कारवाईदेखील केली आहे. मात्र, शासन आदेशानुसार प्रत्येक घटकांच्या आस्थापनांना ठरावीक वेळेचे बंधन घातले असून, त्यानंतर त्यांनी आस्थापना सुरू ठेवल्या तर कारवाई करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. 2016 मधील शासन आदेशानुसार, हॉटेल, खाद्य-मद्यविक्री करणार्‍या आस्थापनांसह बारला वेळेचे बंधन वेगवेगळ्या स्वरूपात आहे. त्यामुळे शासन आदेशातील वेळेनुसार आस्थापना बंद करण्याचे आदेश पोलिस आयुक्तालयाने पोलिस ठाण्यांना दिले आहेत.

या वेळेपर्यंत सुरू राहतील आस्थापना….
देशी मद्यविक्रीची दुकाने रात्री 10पर्यंत, खाद्यपदार्थ व मद्यविक्रीची दुकाने रात्री 11.30 पर्यंत, हॉटेल मध्यरात्री 12.30 पर्यंत, परमिट रूम, बिअर बार व डिस्कोथेक मध्यरात्री 1.30 पर्यंत सुरू ठेवता येतात. तर सिनेमागृहे मध्यरात्री 1 पर्यंत सुरू ठेवता येतात.

स्थानिक पोलिसांची परवानगी आवश्यक
आयुक्तालय हद्दीत सार्वजनिक मनोरंजनाच्या जागांसाठी, कॅब्रे, नृत्य कार्यक्रम, डेस्कोथेक, खेळमेळे व तमाशे यांसारख्या सार्वजनिक कार्यक्रमांना पोलिस आयुक्तालय कार्यालयाचा परवाना घेण्याची आवश्यकता नाही. स्थानिक पोलिस ठाण्यांकडे कळवण्यात यावे, तसा आदेश 2016 मध्ये कार्यालयाने काढला आहे. तर बंदिस्तऐवजी खुल्या ठिकाणी होणार्‍या कार्यक्रमांसाठी पूर्व परवानगी आवश्यक असेल, असे आयुक्तालयाने स्पष्ट केले.

हेही वाचा:

The post नाशिक : हॉटेल, दुकाने सुरु राहण्याबाबत होणार कारवाई; पोलिस आयुक्तालयाकडून रात्री दहाच्या वेळेत बदल appeared first on पुढारी.

Exit mobile version