नाशिक होणार उत्तर-दक्षिणचे मध्यवर्ती केंद्र – नितीन गडकरी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
त्रिवेंद्रम, हैदराबाद, कन्याकुमारी, बंगळुरू यासह संपूर्ण उत्तरेला दक्षिणेशी जोडणारे नाशिक हे मध्यवर्ती ठिकाण ठरणार आहे. त्यामुळे उत्तरेतून दक्षिणेत जायचे असेल तर मुंबई, पुणे किंवा सोलापूर, कोल्हापूरला जाण्याची गरज नसेल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी केले. तसेच नाशिक हे देशाचे मध्यवर्ती स्थान असून, नाशिकला लॉजिस्टिक कॅपिटल बनविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले.

महाकवी कालिदास कलामंदिर येथे नाशिक जिल्हा ट्रान्स्पोर्ट असोसिएशनच्या वतीने आयोजित केलेल्या ऑटो ण्ड लॉजिस्टिक समिटमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड, कार्यकारी अध्यक्ष पी. एम. सैनी, संजीव बाफना, जितेंद्र शाह, मलकीतसिंग बल, अमृतलाल मदन, प्रकाश गवळी, सुरेश खोसला आदी उपस्थित होते. ना. गडकरी म्हणाले, हिमाचल प्रदेशातील मनालीवर जाण्यासाठी पूर्वी साडेतीन तास लागायचे, आता अटल टनेलमुळे 8.30 मिनिटांत जाणे शक्य झाले आहे. तेथून आल्यावर चार टनेलने लडाख, त्यानंतर कारगिल येथे आशियातील सर्वांत मोठा 12 किलोमीटरचा टनेल पूर्ण होत आहे. तेथून थेट श्रीनगरला आल्यास जम्मूला पुन्हा सहा टनेलचा रस्ता जवळपास पूर्ण झाला आहे. दिल्ली-कटरा द्रुतगती महामार्ग तेथून आहे. कटराच्या आधीच महामार्गावर वळल्यास अमृतसरवरून चार तासांवर दिल्ली आहे. दिल्लीवरून मुंबई एक्स्प्रेस हायवेवर आल्यास 12 तासात मुंबई गाठता येते. मुंबईच्या आधी सुरतवरून थेट दक्षिणेत कन्याकुमारीला जाता येते. म्हणजेच काश्मीर ते कन्याकुमारी या रस्त्यांच्या नेटवर्कशी नाशिक जिल्हा जोडला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.  रस्ते आणि इंधनावर बोलताना ते म्हणाले की, पूर्वी एक ट्रक दिवसातून दोनशे ते सव्वादोनशे किलोमीटर चालायचा. आता हायवे तयार झाल्याने तो साडेतीनशे ते चारशे किलोमीटर चालणार आहे. तसेच डिझेल सर्वात प्रदूषण करणारे आणि महागडे इंधन असल्याने इतर पर्यायांचा सर्वांनी विचार करणे गरजेचे आहे. नुकतेच दालमिया सिमेंटमध्ये 50 ट्रक एलएनजीवर सुरू केले. जिथे 100 रुपयांचे डिझेल लागते, तेथे 40-45 रुपयांचा एलएनजी लागतो. त्यामुळे हा पर्याय परवडणारा आहे. अशोक लेलॅण्ड आणि टाटाने असे इंजिन तयार केले जे हायड्रोजनवर चालणार आहे. इलेक्ट्रिकचा ट्रक तर फारच स्वस्त आहे. जिथे 100 रुपयांचे डिझेल लागते, तिथे 10 रुपयांची इलेक्ट्रिक लागेल. त्यामुळे ट्रान्स्पोर्टवाल्यांसाठी एलएनजी, सीएनजी, बायोडिझेलमध्ये इथेनॉल, मिथेनॉल आणि ग्रीन हायड्रोजन महत्त्वाचे ठरणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी ऑटो ॲण्ड लॉजिस्टिक एक्स्पोच्या लोगोचे प्रातिनिधीक अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परी ठोसकर यांनी केले.

द्वारका चौकात डबलडेकर पूल : द्वारका चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पूल बांधण्यात आला. आता डबलडेकर पूल बांधण्यात येणार असल्याचेही ना. गडकरी यांनी स्पष्ट केले. तसेच शहराच्या बाहेर ट्रान्स्पोर्टनगर उभारण्यासाठी पुढाकार घेतल्यास ट्रक बाहेरूनच हायवेमार्गे इतरत्र जाऊ शकतील असेही त्यांनी सांगितले. एनएचआयकडून निफाड साखर कारखान्याजवळची जागा घेणार आहोत. जेणेकरून नाशिकवरून एक्स्पोर्ट आणि इम्पोर्ट सुरू होईल, असे झाल्यास मुंबईचा समुद्र नाशिकमधूनच सुरू होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

आमदारांचा काढता पाय : ना. नितीन गडकरी यांचे शहरात विविध कार्यक्रम आयोजित केले होते. या कार्यक्रमात पक्षाचे पदाधिकारी, आमदार, खासदार यांना लांबच ठेवल्याचे दिसून आले. ऑटो ण्ड लॉजिस्टिक समिटमध्ये आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे यांनी हजेरी लावली खरी, परंतु कार्यक्रम सुरू होताच त्यांना काढता पाय घ्यावा लागला. त्याचबरोबर नामको-धारीवाल कार्डियाक सेंटरच्या लोकार्पण सोहळ्यातदेखील तनुजा घोलप यांनी ना. गडकरी यांचा सत्कार करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनाही लांबच ठेवण्यात आल्याचे दिसून आले.

ट्रान्स्पोर्टनगरसाठी प्रस्ताव : ट्रान्स्पोर्ट सेक्टरमध्ये मोठे परिवर्तन सुरू आहे. परंतु डिझेलमुळे हा व्यवसाय तोट्यात असून, नव्या इंधन पर्यायाचा विचार करण्याची गरज आहे. तसेच ट्रान्स्पोर्ट असोसिएशनचे शहराच्या बाहेर ट्रान्स्पोर्टनगर उभारण्यासाठी मनपा आयुक्त, जिल्हाधिकारी यांना प्रस्ताव द्यावा, जेणेकरून वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा:

The post नाशिक होणार उत्तर-दक्षिणचे मध्यवर्ती केंद्र - नितीन गडकरी appeared first on पुढारी.