Site icon

नाशिक : ७५ हजारपैकी केवळ नऊ हजार थकबाकीदारांकडूनच कर जमा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महापालिकेने शहरातील ७५ हजार ९६२ थकबाकीदारांना नोटिसा बजावल्या होत्या. परंतु, त्यापैकी केवळ ९ हजार ४७ थकबाकीदारांकडूनच २४ कोटी २० लाख रुपयांची थकीत घरपट्टी मनपाच्या तिजोरीत जमा झाली आहे. इतर ६७ हजार थकबाकीदारांनी कर भरण्याकडे पाठ वळविल्याने संबंधितांवर दंडात्मक कारवाईसह त्यांच्या मालमत्ता जप्तीचे वॉरंट बजावले जाणार आहे. आतापर्यंत १८१ जप्ती वॉरंट बजावले आहे.

कोरोना महामारीच्या काळात मनपाच्या घरपट्टी, पाणीपट्टी कराकडे बहुतांश करदात्यांनी पाठ वळविली. त्यामुळे मनपाच्या महसुलाला मोठा फटका सहन करावा लागला. त्यामुळे आता कोरोनानंतर कर वसुलीकरिता महापालिकेने धडक पावले उचलली आहेत. त्यानुसार पहिल्या टप्प्यात शहरातील १,२४८ बड्या थकबाकीदारांची नावे जाहीर केली होती. संबंधितांच्या घरासमोर तसेच कार्यालयासमोर ढोल बजाओ मोहीम राबविण्यात आली होती. तसेच ७५ हजार ९६२ थकबाकीदांना नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. थकबाकीदारांकडे घरपट्टीची जवळपास ३०९ कोटींची थकबाकी आहे. ४९ कोटी ९११ लाख रुपयांची चालू देणी आहेत. त्यानुसार मनपाने थकबाकीदारांना नोटिसा बजाविल्या होत्या. त्यापैकी पाच हजार ७५९ थकबाकीदारांनी पूर्ण, तर तीन हजार २८८ थकबाकीदारांनी अर्धी थकबाकी अशी एकूण २४ कोटी २० लाख रुपयांची थकबाकी भरली. अद्यापही ६७ हजार थकबाकीदारांनी नोटिशीची दखल न घेता त्याकडे पाठ फिरविल्याने अशा थकबाकीदारांना जप्ती वॉरंट बजावून दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले आहेत.

नोटिशीच्या मुदतीत थकबाकीदारांनी घरपट्टीची रक्कम महापालिकेकडे जमा न केल्यास संबंधित मिळकत जप्त केली जाणार आहे. आतापर्यंत १८१ थकबाकीदारांना कर आकारणी विभागाने जप्ती वॉरंट बजावले आहे. या थकबाकीदारांकडे ६ कोटी ८१ लाखांची थकबाकी आहे. त्यापैकी ७ जणांनी पूर्ण, तर २७ जणांनी भागश: घरपट्टी भरत पालिकेच्या कारवाईतून आपली सुटका करून घेतली आहे.

विभागनिहाय थकबाकीदार, कंसात थकबाकीची रक्कम (कोटींत)

सातपूर – ८,७१९ (२४.५०)

नाशिक पश्चिम – ४,७३३ (३४.१४)

नाशिक पूर्व – १४,५९८ (८२.१२)

पंचवटी – २२,७४७ (९१.३७)

सिडको – १५,४३८ (४८.३०)

नाशिकरोड – ९,७२७ (६५.२५)

जप्ती वॉरंट बजावलेले थकबाकीदार
सातपूर – १५
नाशिक पश्चिम – ५१
नाशिक पूर्व – १५
पंचवटी – ४८
सिडको – २७
नाशिकरोड – २५
एकूण -181

हेही वाचा : 

The post नाशिक : ७५ हजारपैकी केवळ नऊ हजार थकबाकीदारांकडूनच कर जमा appeared first on पुढारी.

Exit mobile version