नाशिक : 127 दिवसांत 56 जणांचा अपघाती मृत्यू; भरधाव ठरतेय कारण

अपघात www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरात 1 जानेवारी ते 7 मे या कालावधीत 56 जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे. त्यात नाशिकरोड, पंचवटी पोलिस ठाण्यात प्रत्येकी 9-9 जणांचा अपघाती मृत्यू झाला असून, त्याखालोखाल आडगावच्या हद्दीत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. अतिवेगवान वाहने, वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष, जखमींना वेळेत मदत न मिळणे या कारणांमुळे अपघाती मृत्यू होत असल्याचे निरीक्षण नोंदवले जात आहे.

शहराच्या वाढत्या विस्तारात रस्त्यांचे जाळेही वाढले आहे. प्रशस्त रस्ते झाल्याने वाहतूक वेगवान झाली आहे. वाहनांची संख्याही वाढल्याने वाहतूक कोंडीची समस्या वाढली आहे. मात्र, त्याचबरोबर अपघातांची संख्याही वाढली आहे. प्रशस्त रस्ते असल्याने अनेक जण वेगाने वाहने चालवत असतात. त्यामुळे वाहनांवर नियंत्रण न मिळवता आल्याने अपघातांना निमंत्रण मिळत असून, त्यात 56 जणांना जीव गमवावा लागला आहे. त्यात लहान मुलांचाही समावेश असून, पादचार्‍यांचाही अपघाती मृत्यू झाला आहे. राष्ट्रीय, राज्य महामार्ग असलेल्या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत सर्वाधिक अपघात होत असल्याचे दिसते.

अपघातांची कारणे अशी…
* वाहनांचा भरधाव वेग
* वाहतूक नियमांकडे चालकांचे दुर्लक्ष
* अतिक्रमणे, गतिरोधक, रस्त्यांवरील खड्डे
* नादुरुस्त वाहने, अंधारात वाहने न दिसणे
* रस्त्यालगतची किंवा रस्त्यावरील वृक्षांवर वाहने आदळल्याने

शहरातील पोलिस ठाणेनिहाय अपघाती मृत्यू असे…
नाशिकरोड (09), पंचवटी (09), आडगाव (08), मुंबईनाका (06), अंबड (05), गंगापूर (04), उपनगर (04), सातपूर (06), म्हसरूळ (03), भद्रकाली (02).

हेही वाचा:

The post नाशिक : 127 दिवसांत 56 जणांचा अपघाती मृत्यू; भरधाव ठरतेय कारण appeared first on पुढारी.