नाशिक :  16 गाव योजनेच्या नूतनीकरणास अखेर वेग

पाणीपुरवठा

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा

लासलगाव, विंचूरसह 16 गाव पाणीपुरवठा योजनेच्या कामास आठवडाभरात कार्यारंभ आदेश प्राप्त होणार आहे. त्यामुळे नूतनीकरणाच्या कामाला तातडीने सुरुवात करण्याची सूचना माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

येथे भुजबळ यांच्या उपस्थितीत लासलगाव विंचूरसह 16 गाव पाणीपुरवठा योजना आढावा बैठक झाली. यात भुजबळ यांनी पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील व पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजीव जायस्वाल यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधत योजनेच्या कामाबाबत चर्चा केली. योजनेच्या कामाला आठवडाभरात कार्यारंभ आदेश देण्यात येईल, अशी माहिती ना. पाटील यांनी भुजबळ यांना दिली. छगन भुजबळ म्हणाले की, योजनेसाठी दोन ठिकाणांहून पाण्याचे पंपिंग करावे लागते. वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने जलवाहिनीमधील पाणी पुन्हा मागे जाऊन प्रेशरमुळे पाइपलाइन अधिक जुनी झाल्याने लीकेज होऊन वारंवार पाणीपुरवठा खंडित होतो. वीजपुरवठा खंडित होऊ नये, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी महावितरण अधिकाऱ्यांना दिल्या. ते म्हणाले की, योजनेची पाइपलाइन अधिक जुनी झाल्याने जलजीवन मिशन अंतर्गत रेट्रोफिटिंग योजनेंतर्गत २० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. निविदा प्रक्रिया झाली. मात्र, सत्ता परिवर्तनाने कार्यारंभ आदेशाला विलंब झाला. आता या खात्याचा पदभार पुन्हा गुलाबराव पाटील यांनी स्वीकारला आहे. याबाबत मंत्र्यांशी आपण चर्चा केली असून, आठवडाभरात कार्यारंभ आदेश प्राप्त होऊन कामास सुरुवात होईल, अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली. ते म्हणाले की, मध्यंतरीच्या काळात अतिवृष्टीने नांदूरमध्यमेश्वर धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले होते. त्यामुळे या योजनेची जलवाहिनी उघडी पडल्याने पाणीपुरवठा बंद झाला होता. ही बाब लक्षात आल्यावर आपण तातडीने दोन दरवाजे बंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, गाळाचे प्रमाण अधिक असल्याने काही काळ गढूळ पाणीपुरवठा झाला. त्यानंतर पुन्हा नियमित पाणीपुरवठा सुरळीत झाला. बैठकीस लासलगावचे सरपंच तथा समितीचे अध्यक्ष जयदत्त होळकर, गटविकास अधिकारी संदीप कराड, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुबोध मोरे, अ. पी. बिन्नर, उपअभियंता एस. मिस्त्री, महावितरणचे कार्यकारी अभियंता आव्हाड, उपकार्यकारी अभियंता नीलेश नागरे, प्रवीण सोनवणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता गोसावी आदी उपस्थित होते.

आठ दिवसांत साइडपट्ट्यांचे मजबुतीकरण

लासलगाव – विंचूर रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढत आहे. या रस्त्याचे चौपदरीकरण करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. त्याला विलंब होत असल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या साइडपट्ट्यांचे मजबुतीकरण करावे. त्याचप्रमाणे लासलगाव – कोटमगाव रस्त्याच्या साइडपट्ट्यांचे मजबुतीकरण करण्यात यावे, तसेच रस्त्यावरील खड्डेदेखील तातडीने बुजविण्याच्या सूचना भुजबळ यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या.

हेही वाचा:

The post नाशिक :  16 गाव योजनेच्या नूतनीकरणास अखेर वेग appeared first on पुढारी.