नाशिक : 31 तासाची कामगिरी करत ११,००० स्क्वेअर फूट रांगोळीतून सावित्रीबाई यांना जयंतीनिमित्त अभिवादन

सटाणा www.pudhari.news

नाशिक (सटाणा): पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील मुंजवाड येथील महात्मा ज्योतिबा फुले शिक्षण संस्था संचलित जनता विद्यालय मुंजवाड येथे मंगळवारी (दि.३) सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त तब्बल ११,००० स्क्वेअर फुटाची सावित्रीबाई यांच्या प्रतिमेची रांगोळी काढण्यात आली. या विश्वविक्रमी ठरणाऱ्या कामगिरीची आकर्षक रांगोळीकला पाहण्यासाठी दिवसभर मोठी गर्दी झाली होती.

मंगळवारी (दि.३) सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त तालुकाभरात ठिकठिकाणी विविध कार्यक्रम पार पडले. विविध संस्था, पक्ष, संघटनांच्या वतीने सावित्रीबाई यांचे प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले. तसेच विविध सामाजिक उपक्रम व कार्यक्रम आयोजित करण्यात आले. त्याचप्रमाणे मुंजवाड येथील जनता विद्यालयाने मात्र अनोख्या पद्धतीने सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केले. संस्थेचे अध्यक्ष गोकुळ जाधव, सचिव तुकाराम सूर्यवंशी व मुख्याध्यापक एस. आर. जाधव यांच्या मार्गदर्शनानुसार कलाशिक्षक दिगंबर अहिरे यांनी विद्यालयाच्या मैदानावर तब्बल ११,००० स्क्वेअर फुटाची रांगोळी काढली. तब्बल तीन दिवस अथक परिश्रम घेऊन विक्रमी कामगिरी फत्ते केली. त्यासाठी त्यांना तब्बल २०५० किलो रांगोळी लागली. रांगोळीच्या माध्यमातून सावित्रीबाई फुले यांचे चित्र रेखाटण्यासाठी कलाशिक्षक आहिरे यांना विद्यालयातीलच आठ शिक्षक, शिक्षिका आणि ३० विद्यार्थ्यांचेही महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले. जवळपास ३१ तास काम करून ही विक्रमी रांगोळी साकारण्यात आलली. साहजिकच ही विक्रमी कलाकृती पाहण्यासाठी मंगळवारी (दि.३) विद्यालयाच्या आवारात बघ्यांची मोठी गर्दी झाल्याचे दिसून आले. सावित्रीबाई फुले यांना एखाद्या विद्यालयाकडून अशा पद्धतीने विक्रमी अभिवादन करण्याची ही पहिलीच घटना असल्याने याबाबत सर्वत्र चर्चा होत असून विद्यालयातील शिक्षक व विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे. संस्थेच्या संचालक मंडळानेदेखील या उपक्रमाबाबत शाळेचे विशेष कौतुक केले आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : 31 तासाची कामगिरी करत ११,००० स्क्वेअर फूट रांगोळीतून सावित्रीबाई यांना जयंतीनिमित्त अभिवादन appeared first on पुढारी.